esakal | विश्वासातील लोकांशी संवाद हाच आजारावरील उपाय | Health Day
sakal

बोलून बातमी शोधा

Health Day
विश्वासातील लोकांशी संवाद हाच आजारावरील उपाय

विश्वासातील लोकांशी संवाद हाच आजारावरील उपाय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - आपल्या जवळच्या विश्वासातील लोकांशी साधलेला सतत संवाद, हा मानसिक आजारावरचा सर्वांत चांगला उपाय आहे. आपल्या मनातील खदखद बोलून मन हलके करा. त्यामुळे नैराश्य आणि त्यातून येणारे आत्महत्येसारखे विचार निश्चित दूर ठेवता येतील, असा विश्वास मानसोपचारतज्ज्ञांनी शनिवारी व्यक्त केला.

कोरोना उद्रेकाचा थेट परिणाम आर्थिक घटकावर निश्चित झाला. तसाच, त्याचा दूरगामी दुष्परिणाम मानसिक आरोग्यावर झाला. कोरोनाचा सर्वाधिक ताण डॉक्टर, परिचारिका अशा आरोग्य सेवा देणाऱ्यांवर होता. ऑनलाइन शिक्षण घेणारे विद्यार्थी, कारखान्यांमधील बेरोजगार होणारे कामगार, दिवसेंदिवस एकटे राहावे लागणाऱ्या असंख्य नागरिकांचे मानसिक आरोग्य कोरोनामुळे धोक्यात आले. त्यातून बाहेर येण्यासाठी एकमेकांशी संवाद वाढविण्याचा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांनी दिला.

येत्या रविवारी (ता. १०) जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा होत आहे. ‘सर्वांसाठी मानसिक आरोग्य सेवा चला, प्रत्यक्षात आणू’ ही या वर्षीची संकल्पना आहे. ज्युपिटर हॉस्पिटलच्या मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हिमानी कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘कोरोनाचा जगभर झालेला उद्रेक आणि लॉकडाउन यामुळे मानसिक आरोग्याची गुणवत्ता खालावली. ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीशी जुळवून घेणे, मुलांचे ऑनलाइन शाळा-कॉलेज अध्ययन, इतर कुटुंबीयांशी, मित्रमंडळींशी आणि सहकाऱ्यांशी संपर्क होऊ न शकणे, नोकरी जाणे, व्यवसायात गती न मिळणे, जवळच्या माणसांचे होत असलेले मृत्यू आणि आपल्याला विषाणूचा संसर्ग होऊ न देण्याची दक्षता घेत जीवनशैलीत बदल पचविणे या सगळ्यामुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावर मोठा ताण पडला. लहान मुले, वयोवृद्ध, स्त्रिया आणि सर्व वयोगटांतील पुरुष या सर्वांना कमी-अधिक प्रमाणात मानसिक आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागला. काही रुग्णांमध्ये या समस्या ‘क्लिनिकल डिप्रेशन’पर्यंत टोकाला पोचल्या.’’

हेही वाचा: मुसळधार पावसामुळे पुणे तुंबले

तुम्ही काय करू शकता

 • तुमच्या जवळच्या, विश्वासू माणसांजवळ भावना व्यक्त करा

 • मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक यांचा सल्ला घ्या

 • तुम्हाला आनंद मिळेल अशा गोष्टी करण्यात मन गुंतवा

 • तुमचे मित्र आणि नातेवाईक यांच्या सतत संपर्कात रहा

 • नियमित व्यायाम करा. किमान काही किलोमीटर फक्त चालून या

 • खाण्याच्या आणि झोपण्याच्या वेळा कसोशीने पाळा

 • मद्यपान आणि धुम्रपान यापासून स्वतःला दूर ठेवा

आजच्या काळाची गरज

मानसिक आरोग्याचे संतुलन नेमके कसे करावे, याचा सल्ला देणारे तज्ज्ञ आपल्या १३० कोटी लोकसंख्येच्या देशात चार हजारांहून कमी आहेत. सामान्य जीवन चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी मानसिक आरोग्य सेवा सुधारण्याची आणि ती सर्वांसाठी उपलब्ध करून देणे, ही आजच्या काळाची गरज आहे.

मानसिक आरोग्यविषयक समस्यांच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी अनेक उत्तम औषधे आणि उपचारपद्धती उपलब्ध आहेत. रुग्णामध्ये आजाराची लक्षणे कमी होऊन बऱ्यापैकी काळ लोटल्यानंतर ही औषधे हळूहळू कमी करता येऊ शकतात.

- डॉ. हिमानी कुलकर्णी, मानसोपचारतज्ज्ञ

नैराश्याचे दुष्परिणाम

 • नैराश्य कोणालाही येऊ शकते. हा व्यक्तिमत्त्वाचा कमकुवतपणा नाही.

 • सततचे दुःख, सहज आनंद मिळणाऱ्या गोष्टीतून स्वारस्य कमी होणे आणि दैनंदिन कामे करण्यात अडथळे येणे अशी लक्षणे असणारा आजार म्हणजे नैराश्य.

 • ऊर्जा कमी होणे, भूक मंदावणे, झोपेची वेळ कमी होणे किंवा जास्त होणे, एकाग्रता कमी होणे, अस्वस्थता वाढणे हे सगळे नैराश्याचे दुष्परिणाम आहेत.

 • आपल्याला आलेल्या नैराश्यावर निश्चित उपचार होऊ शकतात. पण काळजी करू नका. नैराश्याचा उपचार केला जाऊ शकतो. एकमेकांशी मनमोकळा साधलेला संवाद, योग्य औषधोपचार हे यावरचे प्रभावी मार्ग आहेत.

loading image
go to top