पुण्यात कोरोना लशीचे नाही तर सल्ल्याचे 'डोस'; आयुक्तांकडे तक्रारींचा पाऊस

corona_vaccination
corona_vaccination

पुणे : कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणाची मोहीम व्यापक करण्याची महापालिकेची घोषणा पोकळ ठरली आहे. ना लशीचे डोस आहेत; ना लसीकरण केंद्र उभारले गेले. परिणामी, लस टोचून घेण्याच्या आशेने येणाऱ्यांना ‘डोस नाहीत, उद्या या,’ अशा सल्ल्याचेच डोस पाजले जात आहेत.

प्रश्‍न : महापालिकेने काय घोषणा केली होती?
उत्तर - कोरोनाची साथ वेगाने पसरताच चाचण्यांपाठोपाठ लसीकरण केंद्र वाढून निकषानुसार अधिकाधिक लोकांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले. ४५ पेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना लस देण्याच्या मोहिमेत दोनशे लसीकरण केंद्र सुरू करून पुरेशा प्रमाणात डोस उपलब्ध केले जातील, अशी घोषणा महापालिकेने केली.

प्रश्‍न : प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे?
उत्तर - आधीच्या १२४ केंद्रांसोबत खासगी रुग्णालयांत नव्याने ७५ केंद्र सुरू होतील; ज्यामुळे लोकांना कमीत-कमी वेळेत लस घेता येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. परंतु गेल्या काही दिवसांपासून जुन्या १२४ केंद्रांवर लस उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत. तेव्हा नियोजित ७५ पैकी जेमतेम ३५ केंद्र सुरू झाले. त्यानुसार आता १४५ केंद्र सुरू आहेत.

प्रश्‍न : नागरिकांना लस मिळते का?
उत्तर - केंद्रांवर नागरिकांना लस मिळत नसल्याचे चित्र आहे. लशीचे डोस नसल्याने रुग्णालये व्यवस्थापनापुढेही अडचणी निर्माण झाल्या आहेत. लस मिळणार असल्याचे जाहीर झाल्याने केंद्रांवर लोकांची गर्दी होत आहे. मात्र, डोसचा पुरवठाच होत नसल्याने लोकांना काय सांगायचे, असा प्रश्‍न रुग्णालय व्यवस्थापनाकडून विचारला जात आहे. तरीही, रोज २० ते २२ हजार लोकांना लस देण्यात येत आहे. डोस कमी पडू देणार नाही, असे महापालिका सांगत आहे. परंतु, मागणीच्या तुलनेत लस का मिळत नाही, हे मात्र महापालिकेला सांगता येत नसल्याचे दिसत आहे.

असा आहे गोंधळ
- पुणे शहरात आतापर्यंत ५ लाख ८१ हजार ५४० जणांना लस देण्यात आली आहे.
- हा आकडा मंगळवारी रात्री सव्वासहा लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे.
- गेल्या तीन दिवसांत महापालिकेला ४२ हजार डोस आल्याचे आरोग्य खात्याकडून सांगण्यात आले.
- दुसरीकडे, लसीकरण अधिकाऱ्यांपासून ती पुरवठा करणाऱ्या यंत्रणेबाबत महापालिका आयुक्तांकडे तक्रारींचा पाऊस होत आहे.
- लसीकरणाच्या मोहिमेत सूसुत्रता आणण्यासाठी कार्यवाही होत नसल्याचे दिसत आहे.
- लस कुठे घ्यायची अशी स्थिती नागरिकांची आहे.
- लशीचे डोस कोणाकडून मिळणार, अशा कात्रीत खासगी रुग्णालये सापडली आहेत.

आतापर्यंत उपलब्ध डोस - ६ लाख ४३ हजार

लस घेतलेले लोक (मंगळवारपर्यंत) - ५ लाख ८१ हजार ५४०

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com