ससूनच्या इमारतीची कामे पूर्ण करा - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 April 2020

उपमुख्यमंत्र्यांनी केल्या या सूचना... 

  • ससून मधील नवीन इमारतीची राहिलेली कामे तातडीने पूर्ण करा 
  • आवश्‍यकता बघून बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रिडा संकूलात वैद्यकीय सुविधा उभारा 
  • अन्य जिल्हयातील मजूरांच्या स्थलांतराबाबत तेथील जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून निर्णय घ्या 
  • पोलीसांना आरोग्याशी संबंधित आवश्‍यक ती साधने उपलब्ध करून द्या 
  • कोरोनाने कर्मचारी मुत्यू पावल्यास त्यांच्या कुटूंबियांना पन्नास लाखाच्या मदतीचा निर्णय लवकरच

पुणे - कोरोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजना राबविण्यासाठी, आरोग्यसेवा तत्पर आणि सक्षम होण्यासाठी ससून रुग्णालयाच्या  अकरा मजली नवीन इमारतीची उर्वरित कामे गतीने पूर्ण करावीत. गरज भासल्यास शिवछत्रपती क्रीडा संकुलाची इमारत व शैक्षणिक संस्थांच्या इमारतीमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देता येईल का, याचा विचार करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठकीत प्रशासनाला केल्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अन्य जिल्ह्यातील मजुरांच्या स्थलांतराबाबत संबंधित जिल्हाधिका-यांनी एकमेकांशी समन्वय साधून निर्णय घ्यावा. कोरोना प्रतिबंधासाठी विविध विभाग चांगले काम करत आहेत. या कामी कार्यरत शासनाच्या कोणत्याही विभागातील कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची मदत देण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली आहे. याबाबत लवकरच निर्णय होईल, असेही पवार यांनी यावेळी सांगितले. पोलीसांची आरोग्यतपासणी, त्यांना एन-95 मास्क, वैद्यकीय किट व आवश्‍यक ती साधने उपलब्ध करुन देण्यात यावीत, असेही ते म्हणाले. 

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, संदीप बिष्णोई व पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complete Sassoons building work ajit pawar