चांदणी चौकातील काम वेगाने पूर्ण करा - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Collector Dr Rajesh Deshmukh

चांदणी चौकातील एकात्मिक उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामाला जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आज बुधवारी भेट देऊन पाहणी केली.

चांदणी चौकातील काम वेगाने पूर्ण करा - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

खडकवासला - चांदणी चौकातील एकात्मिक उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामाला जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आज बुधवारी भेट देऊन पाहणी केली. या प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करावे. असे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी दिले.

सद्यस्थितीत प्रकल्पाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. जून २०२३ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करणार आहे. जुना पूल पाडल्यामुळे सध्या सेवा रस्त्यासाठी व इतर कामासाठी दोन्ही बाजूचे खडकाचे खोदकाम प्रगतीत आहे. सद्यस्थितीत पुलाच्या ठिकाणी मुंबई-सातारा दिशेला पाच लेन व सातारा- मुंबईसाठी तीन लेन अशा एकूण आठ लेन वाहतुकीस उपलब्ध आहेत. तसेच साताऱ्याकडून एनडीए मार्गे मुंबईला जाण्यासाठी अतिरिक्त २ लेन उपलब्ध आहेत.

बेंगळुरू मुंबई हायवेवरील सद्यस्थितीतील चौपदरी रस्त्याचे सहापदरीकरण करण्यासाठीचे आधार भिंतीचे (रिटेनिंग वॉल) व माती भरावाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरीत काम १५ दिवसात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. श्रृंगेरी मठाच्या बाजूने सातारा वारजेकडे जाणाऱ्या ४ पदरी सेवा रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. वाहतूकीस खुला केलेला आहे. बावधनकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या रॅम्प क्र. ६ चे काम प्रगतीत असून दिड महिन्यात पूर्ण होईल.

कोथरुड- वारजे- सातारा हा सेवा रस्ता महामार्गाला जोडला असून वाहतूकीस खुला केला आहे. उर्वरीत काम पुढील १५ दिवसात पूर्ण होईल. एन डी ए ते मुंबई या रॅम्प क्र. ५ चे काम प्रगतीत असून पुढील १० दिवसात पूर्ण होईल.

मुळशी ते कोथरुड या रस्त्यावरील जुन्या भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम प्रगतीत असून पुढील दीड महिन्यात काम पूर्ण होईल. मुळशी ते सातारा रॅम्प चे काम जवळ जवळ पूर्ण झाले असून त्यावरून मुळशी वरुन येणारी वाहतूक १३ सप्टेंबरपासून वळविण्यात आली आहे.

मुळशी मुंबई रॅम्पच्या उर्वरीत भूसंपादनाच्या कामाच्या अनुषंगाने न्यायप्रविष्ठ प्रकरणात २० ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने भूसंपादनाचे काम करण्यास परवानगी दिलेली आहे. पुणे महानगरपालिकेकडून जागेचा ताबा मिळाल्यानंतर १ नोव्हेंबर २०२२ रोजी पासून प्रत्यक्ष कामास सुरवात केलेली आहे. उर्वरीत काम पुढील एक महिन्यात पूर्ण होईल. त्यामुळे मुळशीकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत होईल, अशी माहिती यावेळी श्री.कदम यांनी दिली.