दृष्टी असलेले गोंधळलेत, तर माझ्यासारख्या दृष्टिहीन विद्यार्थ्यांचं काय?; परीक्षेतील सुविधेबाबत संभ्रम

ब्रिजमोहन पाटील 
Sunday, 20 September 2020

  • योग्य माहिती मिळत नाही
  • प्राचार्यांना सूचना दिल्याचे विद्यापीठाचे म्हणणे

पुणे : "अंतिम परीक्षेवरून दृष्टी असलेले विद्यार्थी गोंधळले आहेत, तर माझ्यासारख्या दृष्टिहीन विद्यार्थ्यांने परीक्षा कशी द्यायची हा मोठा प्रश्न आहे. मी ऑनलाइन परीक्षेचा पर्याय निवडलेला आहे. पण त्यासाठी विद्यापीठ काय सुविधा देणार हे अद्यापही मला माहित नाही," असे एस. पी. महाविद्यालयातून अर्थशास्त्रात एम. ए. करणारा महेश भारती सांगत होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. या परीक्षा रद्द कराव्या, अशी राज्य सरकारची भूमिका होती. पण सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा घेण्याचे आदेश दिले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऑनलाइन व ऑफलाइन माध्यामातून बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) पद्धतीने परीक्षा घेण्याचे निश्चित केले आहे. या परीक्षेसाठी दोन लाख ४८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ८५ टक्के विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा देणार आहेत. 

पुण्यातील अनेक महाविद्यालयात दृष्टिहीन विद्यार्थी पदवी व पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाला आहेत. त्यांनीही परीक्षेची तयारी सुरू केली आहे. पुणे विद्यापीठाने परीक्षेसाठी काढलेल्या परिपत्रकात दिव्यांगांना २० मिनीटे अधिक वेळ दिला जाईल, असे स्पष्ट केले आहे. पण दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी काय सुविधा असणार याचा उल्लेख नाही, त्यामुळे हे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. 

'जम्बो'ने कामगिरी सुधारली; एकाच दिवशी २८ रुग्णांना दिला डिस्चार्ज!

भारती म्हणाला, "इतर वेळी परीक्षेत आमच्या मदतीसाठी सोबत स्वयंसेवक असतात. पण आता घरी बसून ऑनलाइन परीक्षा देणार आहे. आम्ही प्रश्न कसे वाचणार, योग्य पर्याय कसे निवडणार, यासाठी कोणाची मदत घेता येणार आहे का? ते स्पष्ट केलेले नाही. यावर स्पष्टता येणे गरजेचे आहे."

नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेअर ऑफ फिजिकली चॅलेंजचे (एनएडब्ल्यूपीसी) अध्यक्ष राहूल देशमुख म्हणाले, "पुण्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये किमान ३० ते ४० पेक्षा जास्त दृष्टिहीन विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. राज्यभरातही संख्या मोठी आहे. हे विद्यार्थी स्क्रीन रिडींग सॉफ्टवेअरचा वापर करतात. योग्य पद्धतीने स्मार्टफोन वापरू शकतात. पण परीक्षेत अशा सुविधा मिळणार आहे का, हे माहित नाही. यातील विद्यार्थी ऑफलाइन परीक्षा देणार असले, तरी त्यांना कोरोना संसर्गाचा धोका आहे."

दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी चर्चा केली आहे. ऑफलाइन परीक्षा देणाऱ्यांना रायटर देण्याची सूचना महाविद्यालयांना केली आहे. तर ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'स्पीक टू टेक्स्ट' ही सुविधा दिली जाईल. त्यामुळे त्यांना परीक्षा देता येणे सोपे होइल. याबाबत महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना सूचना द्याव्यात.

- डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू, पुणे विद्यापीठ

 

  • एकुण विद्यार्थी : दोन लाख ४८ हजार 
  • नियमीत विद्यार्थी : सुमारे दोन लाख २३ हजार 
  • फेर परीक्षा देणारे विद्यार्थी : सुमारे २३ हजार
  • दिव्यांग विद्यार्थी सुमारे : ८००

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: confusion among blind students about exam facilities pune