'जम्बो'ने कामगिरी सुधारली; एकाच दिवशी २८ रुग्णांना दिला डिस्चार्ज!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 September 2020

डिस्चार्जनंतरही घरी सर्व खबरदारी घ्यावी. कुटुंबीयांसह नियमांचे पालन करावे. पुन्हा त्रास जाणवल्यास त्वरीत 'जम्बो'मध्ये उपचार केले जातील.

पुणे : जम्बो कोविड रुग्णालयातून शनिवारी (ता.19) 28 रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले. जम्बो हॉस्पिटलच्या कार्यपद्धतीत अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याची संख्या वाढली आहे. आयसीयूमधील रुग्णही कोरोनामुक्त होत आहेत. येथील व्यवस्थापनाबाबत रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक समाधान व्यक्त करीत आहेत, अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि जम्बो सेंटरच्या कार्यकारी अध्यक्षा रुबल अग्रवाल यांनी दिली.

मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांना पाठवलं पत्र; अभ्यासकांनी केल्या 'या' मागण्या​

'जम्बो'मध्ये आयसीयू वॉर्डमध्ये गंभीर अवस्थेत दाखल झालेल्या दिलीप गवळी यांच्यावर डॉक्टरांनी तातडीने योग्य उपचार केले. आठ दिवस उपचारांनंतर ते कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्णांची गंभीर प्रकृती लक्षात घेऊन महापौर मुरलीधर मोहोळ वैयक्तिक लक्ष देऊन यंत्रणा राबवत आहेत. यामुळे अत्यंत चांगली सेवा उपलब्ध होत आहे, असे गवळी यांचे नातेवाईक अमोल साठे यांनी सांगितले. 

मी एकवीस दिवस जम्बो सेंटरमध्ये होते, मात्र अजिबात त्रास जाणवला नाही. खूप चांगली व्यवस्था या ठिकाणी केली गेली, असे कोरोनामुक्त झालेल्या एका महिला रुग्णाने सांगितले.

दहावी-बारावीच्या फेरपरीक्षेबाबत प्रश्नचिन्ह कायम; विद्यार्थ्यांचे भवितव्य लागले टांगणीला!​

रुबल अग्रवाल म्हणाल्या, "जम्बोमधील व्यवस्थेत सातत्याने सकारात्मक बदल आणि सुधारणा करण्यात येत आहेत. त्याचा चांगला परिणाम रुग्णसेवेत दिसून येत आहे. रुग्ण आणि नातेवाईकांशी जास्तीत जास्त समन्वय साधण्याचा प्रयत्न आहे. यामुळे रुग्ण प्रशासनाचे धन्यवाद देत आहेत."

डिस्चार्जनंतरही घरी सर्व खबरदारी घ्यावी. कुटुंबीयांसह नियमांचे पालन करावे. पुन्हा त्रास जाणवल्यास त्वरीत 'जम्बो'मध्ये उपचार केले जातील. निगेटिव्ह चाचणी आल्यावरच कामावर जावे, असे आवाहन येथील डॉक्टरांनी केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 28 patients were discharged from Jumbo Covid center Pune on Saturday 19th