‘फास्टॅग’च्या माध्यमातून टोल वसुली बंधनकारक करूनही गोंधळ

महेंद्र शिंदे
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

नेटवर्कची समस्या
खेड-शिवापूर टोल नाक्‍यावर अनेकदा ‘फास्टॅग’ यंत्रणा योग्यरीत्या काम करत नसल्याचे दिसून येते. नेटवर्कची समस्या असल्याने अनेकदा ‘फास्टॅग’ व्यवस्थित स्कॅन होत नाही, त्यामुळे टोल कर्मचारी आणि वाहनचालक यांच्यात वाद होतात. त्यात वेळ जाऊन वाहनांच्या रांगा लागतात. विशेषतः गर्दीच्या वेळी ‘फास्टॅग’ यंत्रणा कोलमडून पडते.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सर्व टोल नाक्‍यांवर १५ जानेवारीपासून ‘फास्टॅग’च्या माध्यमातून टोल वसुली बंधनकारक करण्यात आली. त्याला पंधरा दिवस उलटले तरी गोंधळाची स्थिती आजही कायम आहे. ‘फास्टॅग’च्या वापराबाबत जिल्ह्यातील टोल नाक्‍यांवरील सद्यःस्थितीचा आढावा घेणारी वृत्तमालिका आजपासून...

खेड-शिवापूर - राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) सर्व टोल नाक्‍यांवर पंधरा दिवसांपासून ‘फास्टॅग’च्या माध्यमातून टोलवसुली सुरू झाली आहे. पण, पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोल नाक्‍यावर मात्र ‘फास्टॅग’ यंत्रणा नावालाच आहे. कारण, या टोलवर फास्टॅग मार्गिका असल्या तरी त्यातून फास्टॅग असलेली आणि नसलेलीही वाहने सोडण्यात येतात. त्यामुळे येथे ‘फास्टॅग’ वापराबाबत गोंधळाची स्थिती असून, वाहनांच्या रांगा कायम आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या खेड-शिवापूर टोल नाक्‍यावरून दररोज जाणाऱ्या एकूण वाहनांपैकी ‘फास्टॅग’धारक वाहनांचे प्रमाण फक्त ३५ टक्के आहे. ‘फास्टॅग’ नसलेल्या वाहनांची संख्या सुमारे ६५ टक्के आहे. येथील दोन्ही (साताऱ्याकडून येणारा व पुण्याकडून जाणारा) टोल नाक्‍यावर ‘फास्टॅग’धारक वाहनांसाठी प्रत्येकी नऊ मार्गिका ठेवण्यात आल्या आहेत. तर रोख स्वरूपात टोल देणाऱ्या वाहनांसाठी प्रत्येकी एक मार्गिका ठेवण्यात आली आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून अद्यापपर्यंत रोख मार्गिकेतून ‘फास्टॅग’ नसलेली वाहने, तर ‘फास्टॅग’ मार्गिकेतून ‘फास्टॅग’धारक वाहने याचे वर्गीकरण करण्यात येत नाही. त्यामुळे ‘फास्टॅग’ मार्गिकेतूनच इतर वाहनेही जातात. त्यामुळे ‘फास्टॅग’ असलेल्या वाहनांनाही टोलच्या रांगेत थांबावे लागते. 

पुणेकरांसाठी खुशखबर! वर्षाभरात पीएमपीला मिळणार 984 बसचा बूस्टर! 

‘फास्टॅग’धारक वाहनांना जास्त वेळ टोल नाक्‍यावर रांगेत थांबावे लागू नये, हा ‘फास्टॅग’च्या माध्यमातून टोल भरण्याचा मुख्य उद्देश आहे. मात्र, खेड-शिवापूर टोल नाक्‍यावर हा मुख्य उद्देशच बाजूला पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ‘फास्टॅग’धारक वाहनचालक नाराजी व्यक्त करत आहेत.

‘फास्टॅग’ नसलेल्या वाहनांकडून दुप्पट टोल आकारण्यात येईल, असे ‘एनएचएआय’ने स्पष्ट केले होते. खेड-शिवापूर टोल नाक्‍यावर मात्र या नियमाची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले. ‘फास्टॅग’ नसलेल्या वाहनांना टोलमधील रिटर्न सुविधेचा लाभ दिला जाणार नाही, या नियमाची मात्र अंमलबजावणी होत असल्याचे दिसून आले.

टोल नाक्‍यावरून जाणाऱ्या एकूण वाहनांच्या तुलनेत ‘फास्टॅग’ नसलेल्या वाहनांची संख्या जास्त आहे. त्यामुळे रोखीच्या मार्गिकेत गर्दी झाल्याने इतर वाहने ‘फास्टॅग’ मार्गिकेत घ्यावी लागतात. कधी-कधी तांत्रिक अडचणीमुळे ‘फास्टॅग’ रीड करण्यास उशीर होतो; तसेच ‘फास्टॅग’ वेगवेगळ्या बॅंकांचे असून, या बॅंकांच्या नेटवर्ककडून अनेकदा ‘फास्टॅग’ स्कॅन झाल्याचा संदेश उशिरा येतो.
- अमित भाटिया, व्यवस्थापक, पुणे-सातारा टोल रोड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Confusion by binding toll recovery through fastag