विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांमध्ये संभ्रम कायम

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 January 2021

- जानेवारीपासून शाळा सुरू करण्यास 23 टक्के पालक तयार 
- तर 69 टक्के पालकांच्या मते शाळा एप्रिलपासून सुरू व्हावी 

पुणे : "माझा मुलगा इयत्ता नववीमध्ये असून गेल्या काही महिन्यांपासून घरातूनच ऑनलाइन अभ्यास करतोय. आत शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु कोरोनाच्या भीतीपोटी मुलाला शाळेत पाठवायची हिंमत होत नाही. कोरोनाचा संसर्ग घरापर्यंत पोचू नये, असेच वाटते. त्याशिवाय आता लसीबद्दल बोलले जात आहे. त्यामुळे लसीकरणाचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर किमान तीन महिन्यांनी म्हणजेच साधारणत: एप्रिलपासून शाळा सुरू व्हाव्यात,'' अशा शब्दात अनिता काकडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

शहरातील शाळांमधील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले, असले तरी प्रत्यक्षात शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची उपस्थिती तुलनेने कमी आहे. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, म्हणून शाळा, शिक्षक यांच्यामार्फत जागृती सुरू आहे. शाळांचे निर्जंतुकीकरण, सॅनिटायझर, थर्मामीटर, ऑक्‍सीमीटर, अंतर ठेवून केलेली आसन व्यवस्था याबाबत पालकांना वेळोवेळी माहिती दिली जात आहे. परंतु कोरोना प्रतिबंधात्मक लस प्रत्यक्षात आल्यानंतर किंवा किमान तीन महिन्यानंतर शाळा सुरू करण्यात यावा, असे देशभरातील जवळपास 69 टक्के पालकांचे म्हणणे आहे. "लोकल सर्कल्स'च्या वतीने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशभरात टप्प्या-टप्प्याने शाळा सुरू होत आहेत. मात्र, शाळा सुरू होत असताना, अजूनही शाळेत उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी असल्याचे निदर्शनास येते. या पार्श्‍वभूमीवर हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यात "कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या कमी होत असताना, देशात शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत तुम्हाला काय वाटते?', असा प्रश्‍न विचारण्यात आला होता. यात जवळपास 23 टक्के पालकांनी जानेवारी 2021मध्ये सुरू करण्याला हरकत नसल्याचे मत नोंदविले. तर जवळपास 69 टक्के पालकांनी एप्रिलमध्ये शाळा सुरू व्हावी, अशी प्रतिक्रिया दिली आहे. या सर्वेक्षणात आठ हजार 696 नागरिकांची मते जाणून घेण्यात आली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"शाळा कधी सुरू व्हाव्यात? : 
- जानेवारी 2021 पासून : 23 टक्के 
- एप्रिल 2021 : 69 टक्के 
- शाळांमध्ये मुलांना पाठविण्याची तयारी : 1 टक्के 
- शाळांमध्ये मुलांना पाठविणे धोकादायक : 2 टक्के 
- सांगता येत नाही : 5 टक्के


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Confusion persists among parents about sending students to school due to corona