'टास्क फोर्स'ची मागणी म्हणजे गिरीश बापटांची प्रसिद्धीसाठी उठाठेव! 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 September 2020

खासदार गिरीश बापट यांची मागणी म्हणजे भाजपच्या अपयशाची कबुली असून प्रसिद्धीच्या खटाटोपासाठी ते उठाठेव करीत आहेत, अशी टीका कॉंग्रेस पक्षाकडून मंगळवारी करण्यात आली.

पुणे - ""शहरातील कोरोनाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने टास्क फोर्स पाठवावा अशी खासदार गिरीश बापट यांची मागणी म्हणजे भाजपच्या अपयशाची कबुली असून प्रसिद्धीच्या खटाटोपासाठी ते उठाठेव करीत आहेत,'' अशी टीका कॉंग्रेस पक्षाकडून मंगळवारी करण्यात आली. सहा आमदारांपैकी एखादा अपवाद वगळता उर्वरित पाचही आमदार निष्क्रिय आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष विरेंद्र किराड यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, शहरात गेले सात महिने कोरोनाची साथ थैमान घालत आहे. या कालावधीत भाजपच्या नेत्यांनी साथ नियंत्रणासाठी गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. खासदार बापट यांनी साथ आटोक्‍याबाहेर गेल्यावर केंद्र सरकारकडे मागणी केली. याऐवजी त्यांनी सुरवातीपासूनच लक्ष घालून केंद्र सरकारकडून पुण्यासाठी मदत मिळवायला हवी होती. ते न करता पक्षाच्या वरिष्ठांना खूष करण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी ते आता खटाटोप करीत आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही पाच महिने उलटून गेल्यावर पुण्यात बैठक घेतली. त्या बैठकीनंतरही बापट टास्क फोर्सची मागणी करत आहेत. याचा अर्थ भाजपमध्ये समन्वय नाही. भाजपचे सहा आमदार पुण्यात आहेत. एखादा अपवाद वगळता बाकी निष्क्रीय आहेत. मदतकार्यातही त्यांचा सहभाग दिसत नाही. शहराचे आरोग्य राखणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. तिथे भाजपची सत्ता असूनही शहराचे आरोग्य उत्तम राखण्यात भाजपला अपयश आले आहे, असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे. पुण्यासाठी "आयएएस' अधिकारी नेमले असे बापट यांनी लोकसभेत सांगितले. ते अधिकारी कोण हे बापट यांनी जाहीर करावेत, अशीही मागणी त्यांनी केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खासदार बापट यांनी लोकसभेत सोमवारी पुण्याला वाचविण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी ठरल्यामुळे केंद्र सरकारने टास्क फोर्स पाठवावा. तसेच राज्य सरकारने पुण्यात 20 "आयएएस' अधिकारी नियुक्त केले आहेत. त्यांच्यात समन्वय नसल्यामुळे पुण्यात प्रशासकीय स्तरावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे, असेही त्यांनी म्हटले होते. 

पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या अडीच लाखांपेक्षा जास्त झाली आहे. सोमवारी एका दिवसात जिल्ह्यात 2338 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यात पुणे शहरातील 884 तर, पिंपरी चिंचवडमध्ये 655 आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 584 आणि नगरपालिका क्षेत्रातील 170 रुग्णांचा समावेश आहे. सोमवारी दिवसभरात 76 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील सर्वाधिक म्हणजे 37 रुग्णांचा त्यात समावेश आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress criticizes MP Girish Bapat