मोदींच्या आधी कॉंग्रेसनेच केले पुणे मेट्रोचे भूमिपूजन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

पुणे : 'केंद्र आणि राज्य सरकार प्रादेशिक भेदभाव करत आहेत. याचमुळे त्यांनी नागपूर मेट्रोला प्राधान्य दिले आणि पुणे मेट्रो जाणीवपूर्वक रखडून ठेवली,' असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (शुक्रवार) केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम उद्या (शनिवार) होणार आहे. त्याच्या आधीच कॉंग्रेसने भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकला. 

गेली अनेक वर्षे रखडलेली पुणे मेट्रो आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रुळावर आली आहे. शासनस्तरावरील सर्व परवानगी मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याचे नियोजन सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीने केले. या कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने विरोध केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत राष्ट्रवादी-भाजपमधील या मुद्यावरील तणाव दूर केला. भूमिपूजनाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचेही भाषण होणार आहे. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. मात्र, कॉंग्रेसने या कार्यक्रमाला असलेला विरोध कायम ठेवत पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्तेच भूमिपूजन करण्याची भूमिका घेतली. 

'पुणे मेट्रोसाठी आवश्‍यक असलेल्या सर्व परवानगी पृथ्वीराज चव्हाण यांनीच दिल्या होत्या. यासाठी भाजपने कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत,' असा दावा कॉंग्रेसने केला होता. या पार्श्‍वभूमीवर चव्हाण यांनीही मेट्रोचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्याच्या निर्णयावर टीका केली. या कार्यक्रमाचा निषेध म्हणून कॉंग्रेसने आज स्वारगेटजवळ प्रकल्पाचे भूमिपूजन केले. 

यावेळी चव्हाण म्हणाले, "पुण्यात मेट्रो प्रकल्प उभारण्याचा निर्णय कॉंग्रेसच्या काळात झाला. त्याला गतीही मिळाली. नागपूरआधी पुणे मेट्रो प्रकल्प उभारणे अपेक्षित होते. पण नागपूरलाच प्राधान्य देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पश्‍चिम महाराष्ट्रावर सूड उगविण्यासाठी ही संधी साधली आहे.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress lays foundation for Pune Metro a day before PM Modi