काॅंग्रेसचे आमदार म्हणताहेत, 'उद्या म्हटलं तरी माझी राजीनाम्याची तयारी'

दत्ता जाधव
Wednesday, 27 January 2021

-शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय कुठलाही प्रकल्प केला जाणार नाही  -शेतकरी नाही म्हटल्यावर विमानतळ नाही, हो म्हणाल्यावरच होणार

माळशिरस : पुरंदर तालुक्यात कुठलाही प्रकल्प शेतकऱ्यांची संमती नसताना केला जाणार नाही, असे आश्वासन शेतकऱ्यांना देत. विमानतळाबाबत तुम्ही नाही म्हटला तर नाही होणार व हो म्हटला तरच होणार अशी स्पष्ट आमदार संजय जगताप यांनी मांडली.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

एकाही शेतकऱ्याला दगा देण्याचे काम करणार नाही. शेतकऱ्यांचा निर्णय तोच आमचा निर्णय असेल असे आश्वासन  आमदार जगताप यांनी नव्याने सूचित विमानतळाच्या गावातील शेतकऱ्यांना दिले.

पुरंदर तालुक्यातील विमानतळासाठी यापूर्वी सुचविलेल्या पारगाव, एखतपूर, खानवडी, मंजवडी या गावांच्या विरोधामुळे पर्यायी जागेसाठी सुचविलेल्या राजुरी, रिसे, पिसे, पांडेश्वर, नायगाव या गावातील विमानतळ विरोधी शेतकऱ्यांनी विमानतळास विरोध करण्यासाठी नायगाव येथील सिद्धेश्वर मंदिरात बैठकीचे आयोजन केले होते. 

यावेळी आमदार संजय जगताप यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले व विमानतळाबाबत मी शेतकऱ्यांच्या बरोबर असेल. शेतकऱ्यांचा विरोध असेल तर विमानतळ होणार नाही अशी स्पष्ट भूमिका बैठकीत मांडली. 

यावेळी आमदार जगताप यांनी सांगितले, ''तालुक्यातील यापूर्वी नियोजित जागेवरती तेथील शेतकऱ्यांचा विरोध झाल्याने पर्यायी जागा सुचवणे गरजेचे होते, म्हणून ते काम करण्यात आले. या जागेबाबत प्रशासन, अधिकारी स्तरावर कुठलाही अद्याप निर्णय झाला नाही. त्यापूर्वीच याठिकाणी शेतकऱ्यांकडून विरोध केला जात आहे.

या जागेबाबत अधिकारी स्तरावर काय म्हणणे येते ते आपण पाहू. जर येथील स्थानिक शेतकऱ्यांना विमानतळ नको असेल तर ते होणार नाही. शेतकरी हो म्हटला तरच होईल. आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहे. शेतकर्‍यांची मान्यता नसल्यास कुठलाही प्रकल्प होणार नाही. शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्यासाठी आपण मला निवडून दिले नाही. यामुळे कुठलीही शेतकऱी विरोधी चुकीची गोष्ट होऊ देणार नाही. याबाबत आपण निश्चिंत रहा हे सिद्धेश्वराच्या साक्षीने सांगतो.

हे वाचा - 'तुम्हाला जिवंत सोडत नाही'; जमीन वाटपाच्या रागातून इंदापुरात महिलेचा खून!

तालुक्यात हो म्हणायचे ही राजकारण व नाही म्हणायला ही राजकारण केले जाते आणि नाहीच झाले तरी राजकारण होते अशी टीका देखील त्यांनी विरोधी गटावर केली. बैठकीत नायगाव, राजुरी, रिसे, पिसे, पांडेश्वर या गावातील अनेक तरुणांसह राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, माजी आमदार अशोक टेकवडे, राजुरीचे सरपंच उद्धव भगत, पिसेचे माजी सरपंच गणेश मुळीक, रिसेचे माजी सरपंच विश्वास आंबोले, नायगावचे बाळासो कड, विलास खेसे, प्रदिप खेसे ,महेश कड, नारायण चौंडकर, सदाशिव खेसे, किशोर खळदकर यांच्यासह अनेकांनी आपल्या भावना मांडल्या. यावेळी उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी विमानतळास एकमुखी विरोध दर्शवला.

हे वाचा - 'तुम्हाला जिवंत सोडत नाही'; जमीन वाटपाच्या रागातून इंदापुरात महिलेचा खून!

....माझी राजीनाम्याची तयारी : जगताप 

राजकारण करण्यासाठी मी पद घेतले नसून तालुक्यातील प्रत्येक माणसाची पदाच्या माध्यमातून कामे करण्यासाठी प्रयत्न करत आहे. तो माणूस कुठल्या पक्षाचा हे मी पाहत नाही. उद्या सकाळी म्हटलं तरी माझी राजीनाम्याची तयारी आहे .माझी भूमिका स्पष्ट आहे अशा शब्दात आमदार संजय जगताप यांनी आपल्या भावना मांडल्या.

(संपादन : सागर डी. शेलार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress MLA sanjay Jagtap's support to farmers