

पुणे, ता. १९ ः ‘‘दरवर्षी देशभरातून राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेला (नीट) सुमारे २३ लाख विद्यार्थी बसतात. त्यापैकी सव्वा दोन लाख म्हणजे केवळ दहा टक्के विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळतो. असे असताना, आमच्याकडे १३० कोटी लोकसंख्येचा देश चालविण्याचे सामर्थ्य आहे, असे छातीठोकपणे सांगणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारला २३ लाख विद्यार्थ्यांची परीक्षासुद्धा व्यवस्थित घेता येत नाही का?’’ असा परखड सवाल कॉंग्रेस पक्षाचे नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी बुधवारी केला.
राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. २२) पुण्यात होणाऱ्या ‘छात्रों की गूंज’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी बुधवारी ‘सकाळ’ कार्यालयास भेट देत संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी संवाद साधला. या वेळी पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते. राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा (नीट), जेईई परीक्षेसह विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा पद्धती, पेपरफुटी प्रकरणांसंबंधी पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
पेपरफुटीची प्रकरणे यापूर्वीही घडली. मात्र, त्यावर तातडीने राजीनामे व कारवाई व्हायची. २०१५ पासून आतापर्यंतच्या १० वर्षात १५२ वेळा पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत. त्यावर सरकारकडून कुठलेही उत्तर मिळत नाही किंवा प्राधान्यक्रम ठरवून ठोस कारवाई केलेली नाही. केवळ नीट, जेईई परीक्षाच नव्हे, तर यूपीएससी, एमपीएससी अशा सगळ्याच परीक्षांमध्येही हीच स्थिती आहे, असा आरोप पाटील यांनी केला.
‘भारत जोडो यात्रे’वेळी शेती व शिक्षण या क्षेत्रातील प्रश्न राहुल गांधी यांच्यापुढे आले. त्यानुसार त्यांनी शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज व्यक्त करत काम सुरू केले. त्यानंतर विद्यार्थ्यांशी संबंधित पेपरफुटी व परीक्षा पद्धतीचा मुद्दा हातात घेत त्याविरुद्ध त्यांनी संसदेत आवाज उठविला. २६७ नियमानुसार संसदेत चर्चेची मागणी करून विरोधी पक्षाची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडली आहे, असे पाटील यांनी सांगितले.
अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी सर्वसामान्य नागरिकांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांनीच देणगी दिली आहे. त्याचीही चोरी झाल्याने सर्वांच्याच भावना दुखावल्या आहेत. गृहमंत्र्यांनी चोरीच्या संदर्भात उत्तर द्यावे, अशी मागणी संसदेत केली होती. पण त्यांनी संसदेकडे पाठ फिरवत उत्तर देण्याचे टाळले, असेही पाटील यांनी नमूद केले.
फोडा आणि राज्य करा, हेच भाजपचे धोरण आहे. यापूर्वी देखील महाराष्ट्रात एससीसाठी राखीव आरक्षणामध्ये त्यांनी उपवर्गीकरणाचा घाट घातला. त्याद्वारे इतर महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होईल, असा भाजपकडून प्रयत्न केला जातो. तरीही महत्त्वाचे मुद्दे झाकले जाऊ शकत नाहीत, असेही पाटील यांनी सांगितले.
------------------
सरकारकडे नोकरभरतीचे धोरणच नाही
राज्य सरकारचा आर्थिक डोलारा कोसळलेला असून, कायमस्वरूपी नोकरभरतीचे कोणतेही धोरण राज्य सरकारकडे नाही. याउलट तरुणांना कंत्राटी पद्धतीनेच नोकरीवर ठेवण्याचा प्रकार सध्या सुरु आहे. पूर्वी ६७ टक्के जागा भरती प्रक्रियेद्वारे, तर ३३ टक्के पदोन्नतीने भरल्या जात होत्या. आता ६० टक्के जागा पदोन्नतीने भरल्या जात असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहिरातीमध्ये जाणीवपूर्वक चूक करायची आणि पुढे न्यायालयाद्वारे त्यावर स्थगिती आणून नोकरभरतीचे प्रकरण तसेच ठेवण्याचा प्रकार सरकारकडून सुरु असल्याची टीका पाटील यांनी केली.
------------------------------------
सतेज पाटील म्हणाले
- नारी वंदन बिल व डिलीमीटेशन यांचा काहीही संबंध नाही
- भाजप २४ तास फक्त ‘इलेक्शन मोड’मध्ये काम करते
- ‘एनटीए’वर महाराष्ट्रातील अधिकाऱ्याची अर्धवेळ नेमणूक
- देशातील विद्यार्थ्यांसाठी पूर्णवेळ अधिकारी देण्याकडेही सरकारचे दुर्लक्ष
-----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.