‘एटीएमएस’च्या बहान्याने काँग्रेसचा राष्ट्रवादीवर निशाणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress-NCP
‘एटीएमएस’च्या बहान्याने काँग्रेसचा राष्ट्रवादीवर निशाणा

‘एटीएमएस’च्या बहान्याने काँग्रेसचा राष्ट्रवादीवर निशाणा

पुणे - पीएमआरडीएच्या निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत दुरावा निर्माण झालेला असताना आता महापालिकेच्या मुख्यसभेत ॲडप्टीव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्‍टीमचा (एटीएमएस) विषय मंजूर करताना राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला साथ दिल्याने काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी मधील घटक पक्ष भाजपला मदत करणे हे हे चिंताजनक आहे, या पक्षांनी आत्मपरीक्षण करावे अशी टीका रमेश बागवे यांनी केली आहे. तर मुख्यसभेत ‘एटीएमएस’चा अनुपस्थित असलेले काँग्रेसचे गटनेते आबा बागूल यांनी हा प्रस्ताव रद्द करा अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

गेल्या महिन्यात स्थायी समितीच्या बैठकीत ‘एटीएमएस’चा ५८ कोटीचा प्रस्ताव आयत्यावेळी भाजपने मंजूर केला. हे काम भाजपच्या एका माजी पदाधिकाऱ्याच्या संबंधित ठेकेदाराला मिळाले आहे. त्यावेळी राष्ट्रवादीने पत्रकार परिषद घेऊन या प्रकल्पाला विरोध केला व आंदोलनही केले होते, याची आठवण बागवे यांनी राष्ट्रवादीला करून दिली आहे.

हेही वाचा: पुणे : माजी स्थायी समिती अध्यक्षांचा बैठकीत गोंधळ

मुख्य सभेमध्ये हा विषय मंजुरीसाठी आल्यावर काँग्रेस व शिवसेनेच्या नगरसेवकांनी विरोध केला. या प्रस्तावात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची शंका सामाजिक संस्थानी, संघटनांनी व पक्षांनी उपस्थित केली. त्यामुळे काँग्रेसनेही मुख्य सभेत आवाज उठवला. पण या आधी देखील अनेक विषयांमध्ये राष्ट्रवादीने भाजपसोबत हात मिळवणी करून भ्रष्ट पद्धतीने काढण्यात आलेल्या निविदांना मान्यता दिली आहे. ही गोष्ट पुणेकर भविष्यात नक्कीच लक्षात ठेवतील, अशी टीका बागवे यांनी केली आहे.

महाविकास आघाडीने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने गेल्या ५ वर्षात केलेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याचे ठरविले होते. असे असताना महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी ऐन वेळी घुमजाव करून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला सहकार्य करणे चिंताजनक आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आत्मपरीक्षण करावे असेही बागवे यांनी सांगितले.

loading image
go to top