#Lockdown : पुण्यातून मूळ गावी जायचंय? काँग्रेस करणार रेल्वे प्रवासाचा खर्च

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

पुण्यातून पाच हजार मजुरांच्या रेल्वे प्रवासाचा खर्च काँग्रेस करणार

पुणे : शहरांतून मूळ गावी परतण्यास इच्छुक मजुरांच्या रेल्वे प्रवासाचा खर्च काँग्रेस पक्षातर्फे करण्यात येणार आहे. पुण्यातून पहिल्या टप्प्यात किमान पाच हजार मजुरांना घरी पोचविण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाशी चर्चा सुरू असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोहन जोशी यांनी सकाळशी बोलताना सोमवारी सकाळी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशाच्या विविध राज्यातील शहरांमध्ये अडकलेल्या मजुरांना आपापल्या गावी परत जाण्यासाठी केंद्र सरकारने रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सध्या राज्यातील विविध जिल्ह्यात त्या मजुरांची जिल्हा प्रशासनाकडून नोंदणी सुरू आहे. त्या अंतर्गत या मजुरांच्या प्रवासाचा खर्च त्यांनी करणे अपेक्षित आहे. तसेच एका रेल्वे मधून सुमारे बाराशे मजुरांची वाहतूक होणार आहे. मजुरांच्या प्रवास खर्चाचा प्रश्न पुढे उभा राहिल्यानंतर काही स्वयंसेवी संस्थांनी त्यासाठी निधी उभारून तिकिटाचे पैसे गोळा केले आहेत. पार्श्वभूमीवर  काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशातील सर्वच राज्यातील मजुरांच्या रेल्वे प्रवासाचा खर्च प्रदेश काँग्रेस समित्यांनी करावा, असे आवाहन केले आहे.

कोरोनाशी संबंधित पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यानुसार पुण्यामध्ये देखील याबाबतची तयारी सुरू झाली आहे. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोहन जोशी यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी संपर्क साधला. तसेच या बाबत राज्यातील सर्व मजुरांची संख्या गोळा करून रेल्वे प्रशासनाशी वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्याचे ठरले आहे, अशी माहिती जोशी यांनी दिली.

पुण्यातील नवे आदेश काय सांगतात?

पुण्यात पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे पाच हजार मजुरांना आपापल्या गावी पोहोचवण्यासाठी रेल्वे प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाशी चर्चा सुरू असल्याचे जोशी यांनी सांगितले. पुण्यामध्ये रेड झोन असल्यामुळे रेल्वे सोडण्यावर मर्यादा आल्या आहेत. परंतु अडकलेल्या मजुरांना घरी पोहोचविण्यासाठी पूर्ण खबरदारी घेऊन रेल्वे सोडण्यात यावी, असे जोशी यांनी म्हटले आहे. त्यासाठी शहर काँग्रेसच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले 

पुण्यामध्ये बांधकाम, हॉटेल तसेच विविध उद्योग- व्यवसायांमध्ये सुमारे तीन ते चार लाख मजूर काम करतात. त्यातील किमान दोन लाख मजुरांना आपापल्या गावी जायचे आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या नोंदणीत सुमारे 14 हजार मजुरांची नोंद झालेली आहे. याबाबत पुणे शहर पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या भागात नोंदणी सुरु आहे. राज्यात सर्वाधिक मजूर मुंबई शहरात अडकलेले आहेत. तेथे परराज्यातील सुमारे 10 ते 11 लाख मजूर असण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress will pay for the train journey of five thousand workers from Pune