पुणेकरांनो, 'थर्टी फर्स्ट'ला बाहेर पडताय? जाणून घ्या वाहतुकीतील बदल

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 December 2020

वाहनचालकांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. भरधाव वेगाने वाहने चालवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे : नवीन वर्षांच्या स्वागतासाठी लष्कर परिसरात महात्मा गांधी रस्त्यावर होणा-या गर्दीला टाळण्यासाठी हा रस्ता गुरुवारी (ता. 31) सायंकाळी पाचनंतर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या भागाकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

चौकांत होणारी गर्दी टाळण्यासाठी देखील पोलिसांनी नियोजन केले असून शहरातील वेगवेगळ्या भागातील 30 प्रमुख चौकातील सिग्नल रात्री एकपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे.

श्वान आणि रिक्षावाल्याची हृदयस्पर्शी गोष्ट; लेखिकेची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल!​

महात्मा गांधी रस्त्यावर पूलगेट परिसरातून येणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. लष्कर भागातील इस्कॉन मंदिराकडून अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. सरबतवाला चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दिली. वाहनचालकांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. भरधाव वेगाने वाहने चालवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Big Breaking : MPSCने परीक्षांबाबत केले सर्वात महत्त्वाचे बदल; वाचा सविस्तर!​

शिवाजीरस्ता चारचाकी वाहनांसाठी बंद :
नववर्षाच्या पहिल्या दिवशी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे शुक्रवारी (ता.1) शिवाजी रस्ता सकाळी सात वाजल्यापासून मोटारी तसेच चारचाकी वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गावरून जाणा-या पीएमपी बस पर्यायी मार्गाने सोडण्यात येणार आहेत.

नववर्ष स्वागतासाठी शहराच्या वेगवेगळ्या भागात गर्दी होणार आहे. अनुचित घटना टाळण्यासाठी शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पाच हजार पोलिस बंदोबस्तासाठी राहणार आहे. कोरोनाचा संसर्ग असल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करावे.
- अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Considering crowd for New Year reception Pune traffic police has made changes in traffic