मजूर मिळत नसल्याने बिल्डरांच्या अडचणीत वाढ

दत्ता म्हसकर
Wednesday, 20 May 2020

- कामगार परराज्य व जिल्ह्यात निघून गेले

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील 80 टक्के कामगार परराज्य व जिल्ह्यात निघून गेले आहेत. वाहतूक व्यवस्था नसल्याने स्थानिक कामगार उपलब्ध होत नाहीत. यामुळे प्रामुख्याने शेतकरी व बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महसूल विभागाकडे तालुक्यातील परराज्यातील ४ हजार ७९६ व परजिल्ह्यातील एक हजार ८३१ अशा एकूण ६ हजार ६२७ मजुरांनी आपापल्या गावी जाण्यासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ३ हजार १८३ मजुरांना १९ मे अखेर जुन्नर, ओतूर, आळेफाटा, नारायणगाव येथून एसटी व खासगी बसमधून पाठविण्यात आले असल्याचे तहसीलदार हनुमंत कोळेकर व नायब तहसीलदार सचिन मुंढे यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तालुक्यात प्रामुख्याने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश,पश्चिम बंगाल, छत्तीसगड व बिहार राज्यातील तर राज्याच्या यवतमाळ,वाशीम, जालना,उस्मानाबाद,नगर जिल्ह्यातील मजूर बांधकाम, रस्ते, वीटभट्टी, शेती आदींच्या कामासाठी आले होते. लॉकडाऊनमुळे कामे बंद झालेली त्यात कोरोनाची भीती, उदरनिर्वाहाचा प्रश्न यामुळे आपापल्या घरी जाणे मजुरांनी पसंद केले. काही खाजगी वाहने करून देखील निघून गेले. मात्र, अद्यापही काही मजूर थांबून राहिले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाची विविध कामे मजुराअभावी बंद असल्याचे सांगण्यात आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कामे सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी परराज्यातील कामगार निघून गेलेत.  स्थानिक कामगार देखील उपलब्ध होत नाहीत. बांधकामासाठी आवश्यक मटेरियल उपलब्ध होत नाही. यामुळे नाईलाजस्तव कामे बंद ठेवण्याची पाळी आली आहे. जे कामगार येथे थांबलेत त्यांचा पगार व अन्य खर्च सुरू ठेवावा लागत आहे. शासकीय कार्यालयात कर्मचारी नसल्याने तेथील कामे होत नाहीत. बांधकाम व्यवसाय अडचणीत सापडला आहे.

- विनायक कर्पे, बांधकाम व्यावसायिक.

तालुक्यातील फळबागांसाठी परराज्य व जिल्ह्यातील कामगार प्रामुख्याने उपयोगी होता. द्राक्ष, केळी, टोमॅटो यासारख्या नगदी पिकाच्या देखभालीची जबाबदारी आता स्थानिक मजुरांवर सोपवावी लागणार आहे. मजुरांची वानवा जाणवू लागल्याने त्यांच्या मजुरीत वाढ करावी लागेल अशी चिन्हे आहे. फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे.

- जितेंद्र बिडवई, प्रगतशील शेतकरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Construction Developer is in Difficulties due to Lack of Workers