‘महारेरा’च्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार बांधकाम दर्जाची माहिती मिळणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

‘२ ए’ फार्ममध्ये भरली जाणारी सर्व माहिती संकेतस्थळावर कोणीही पाहू शकणार आहे. त्यामुळे ग्राहकांची बांधकामाच्या दर्जाबद्दलची काळजी दूर होण्यास मदत होणार आहे.
- गौतम चटर्जी, अध्यक्ष, महारेरा

पुणे - बांधकाम अनधिकृत आहे की अधिकृत एवढीच माहिती आतापर्यंत ग्राहकांना मिळत होती. मात्र, बांधकामाचा दर्जा कसा आहे, याबाबत ग्राहकांच्या मनातदेखील प्रश्‍न उपस्थित राहत नव्हता. मात्र, बांधकामाच्या दर्जाबाबतची माहिती ‘महारेरा’च्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. त्यासाठी बांधकामाबाबतची सर्व माहिती ‘२ ए’ फार्मच्या माध्यमातून बांधकाम व्यावसायिकांकडून भरून घेण्यात येत असल्याची माहिती ‘महारेरा’चे अध्यक्ष गौतम चटर्जी यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘महारेरा’च्या मदतीने कुशल क्रेडार्स पुणे मेट्रोतर्फे बांधकाम साईटवरील निरीक्षक अभियंत्यांसाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. 

याबाबत माहिती देण्यासाठी क्रेडाईतर्फे बांधकाम अभियंत्यांसाठी विशेष सत्राचे आयोजन केले होते. त्या वेळी चटर्जी बोलत होते. या वेळी क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष सुहास मर्चंट, क्रेडाई नॅशनलचे उपाध्यक्ष शांतीला कटारीया, कुशलचे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ, उपाध्यक्ष रणजीत नाईकनवरे, समीर बेलवलकर आदी उपस्थित होते. ज्या बांधकाम प्रकल्पांची एक डिसेंबर २०१८ नंतर ‘महारेरा’कडे नोंदणी झाली आहे. अशा सर्व बांधकाम प्रकल्पांना ‘२ए’ या विशिष्ट फार्ममध्ये बांधकाम साहित्य व बांधकाम पद्धतीच्या दर्जाबाबत प्रमाणपत्र जाहीर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यात पाच हजार बांधकाम प्रकल्प सुरू असून, आतापर्यंत १५०० ते १६०० प्रकल्पांनी हा फार्म भरून ‘महारेरा’कडे सादर केला आहे. 

श्रॉफ म्हणाले, ‘‘सीएसडीडीसीआयच्या मान्यतेमुळे या अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र देशभर ग्राह्य धरले जाईल. सिमेंट, स्टील, काँक्रीट, विटा, टाईल्स प्लंबिंग साहित्य, इलेक्‍ट्रिकल साहित्य यांच्याशी निगडित बांधकाम पद्धतीचे प्रमाण कसे करावे, याबाबत या अभ्यासक्रमात प्रशिक्षित केले जाणार आहे.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Construction quality information will be available on Mahreras website