सुधारणा न झाल्यास कंत्राट रद्द

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

पीएमपीच्या इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमचा (आयटीएमएस) आढावा घेऊन यापुढील काळासाठी कृती आराखडा येत्या १० सप्टेंबरपर्यंत पीएमपीपुढे सादर होणार आहे. त्यानंतर ‘आयटीएमएस’ची पुढील वाटचाल निश्‍चित होणार आहे. 

पुणे -  पीएमपीच्या इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमचा (आयटीएमएस) आढावा घेऊन यापुढील काळासाठी कृती आराखडा येत्या १० सप्टेंबरपर्यंत पीएमपीपुढे सादर होणार आहे. त्यानंतर ‘आयटीएमएस’ची पुढील वाटचाल निश्‍चित होणार आहे. 

पीएमपीच्या बसमध्ये बसविलेल्या ‘आयटीएमएस’बाबत चालक, वाहकांच्या तसेच नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. 

मार्गावर धावणारी बस व आयटीएमएसमध्ये होणारी नोंद, यामध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती असल्याचेही उघड झाले आहे. दोन्ही महापालिकांनी याबाबत सुमारे ५५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र, दिवसेंदिवस ही यंत्रणा सक्षम होण्याऐवजी खिळखिळी होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सुधारणा न झाल्यास कंत्राट रद्द करण्याचा इशारा पीएमपीने संबंधित ‘एनईसी’ कंपनीला दिला आहे.

 या पार्श्‍वभूमीवर महापौर मुक्ता टिळक, पीएमपीचे संचालक सिद्धार्थ शिरोळे, महापालिका आयुक्त सौरभ राव, पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे आणि एनईसी कंपनीचे प्रतिनिधी यांची बैठक झाली. या वेळी प्रशासनाकडून ‘आयटीएमएस’मधील  विसंगती मांडण्यात आल्या. तर, अनेक चालक जीपीएस बंद करून ठेवतात, त्यासाठी लॉगिन करीत नाहीत, असे निदर्शनास आणले. तसेच, संगणक प्रणालीचा वापर नेमका कशासाठी करायचा आहे, कोणत्या घटकांचे विश्‍लेषण करायचे आहे, याबाबतही संदिग्धता असल्याचे त्यांनी सांगितले. ‘आयटीएमएस’मधून पीएमपीला नेमके काय हवे आहे, कोणकोणत्या घटकांचे विश्‍लेषण अपेक्षित आहे, याबाबतचा आराखडा तयार करावा, अशी सूचना टिळक आणि शिरोळे यांनी केली. त्यानुसार ‘एनईसी’ कंपनीचे प्रतिनिधी, ‘ई’ आणि ‘वाय’ कंपनीचे प्रतिनिधी आणि पीएमपीचे प्रतिनिधी यांची समिती आराखडा निश्‍चित करणार आहे. हा आराखडा सादर झाल्यावर त्याबाबत पुढील निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रवासी म्हणतात.... 
संजय शितोळे (पीएमपी प्रवासी मंच) - ‘आयटीएमएस’बाबत पीएमपी आणि संबंधित कंपनी परस्परांकडे बोट दाखवीत आहे. पण, ५५ कोटी रुपये खर्च करूनही ही यंत्रणा कार्यान्वित का नाही? जनतेच्या पैशांची उधळपट्टी सहन का करायची? याकडे कोणाचे लक्ष आहे का?

आशा शिंदे (प्रवासी) - पीएमपीच्या बसमध्ये ‘आयटीएमएस’ कधीही योग्य पद्धतीने कार्यान्वित झालेली नाही. गेली दोन वर्षे त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. शेवटी प्रवाशांच्या हातात काय पडले आहे? फक्त मोडकेतोडके फलक! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Contract canceled if no upgrade