सिंहगड रस्त्याच्या सुरू असलेल्या कामाबाबत ठेकेदाराचा हलगर्जीपणा

निलेश बोरुडे
Wednesday, 25 November 2020

नांदेड फाटा ते किरकटवाडी फाटा या दरम्यान काँक्रिटीकरण करण्यासाठी 'स्लीप फॉर्म पेव्हर' मशीन आल्याने दररोज 200 ते 300 फूट लांबीचे काम पूर्ण होत आहे. पूर्ण झालेल्या कामावर दिवसातून किमान दोन वेळा चांगल्या प्रमाणात पाणी मारणे आवश्यक असताना ठेकेदाराकडून पाणी मारताना मात्र हलगर्जीपणा केला जात आहे.

किरकटवाडी : सिंहगड रस्त्याच्या नांदेड फाटा ते किरकटवाडी फाटा दरम्यान सुरू असलेल्या कॉंक्रिटीकरणाच्या कामावर आवश्यक तेवढे पाणी मारले जात नसल्याने रस्त्याच्या मजबुतीवर परिणाम होताना दिसत आहे. खडकवासला बाह्यवळण रस्त्याच्या काम झालेल्या ठिकाणीही अत्यंत कमी प्रमाणात पाणी मारले जात आहे.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तब्बल दोन वर्षांनंतर सिंहगड रस्त्याच्या कामाने वेग घेतला आहे. नांदेड फाटा ते किरकटवाडी फाटा या दरम्यान काँक्रिटीकरण करण्यासाठी 'स्लीप फॉर्म पेव्हर' मशीन आल्याने दररोज 200 ते 300 फूट लांबीचे काम पूर्ण होत आहे. पूर्ण झालेल्या कामावर दिवसातून किमान दोन वेळा चांगल्या प्रमाणात पाणी मारणे आवश्यक असताना ठेकेदाराकडून पाणी मारताना मात्र हलगर्जीपणा केला जात आहे. योग्य प्रमाणात पाणी न मिळाल्याने काँक्रीटला आलेला सफेद रंग स्पष्ट दिसून येत आहे.

खडकवासला बाह्यवळण रस्त्याचे कामही वेगात सुरू आहे. बाह्यवळण रस्त्याच्या कामासह पुलाचे कामही जोमाने सुरू आहे.मात्र त्याठिकाणीही योग्य प्रमाणात पाणी मारले जात नसल्याबाबत खडकवासला येथील नागरिकांच्या तक्रारी आहेत.एकदा झालेले काम पुन्हा पुन्हा होणार नाही त्यामुळे आताच योग्य काळजी घेण्यात यावी अशी मागणी खडकवासला येथील रोहित मते यांनी केली आहे.

कॉंक्रिटीकरण झाल्यानंतर पहिले सात दिवस अत्यंत काळजीपूर्वक पाणी मारत राहावे लागते. रस्त्यावर पाणी साठवून राहिल अशी व्यवस्था करावी लागते किंवा पोती हांथरुन रस्त्यावर ओलसरपणा ठेवावा लागतो.कॉंक्रिटीकरणानंतर 21 दिवस नियमित पाणी मारत रहावे लागते. सिमेंट काँक्रेटला मजबुती येण्यासाठी पुरेसे पाणी मिळणे अत्यंत आवश्यक असते अन्यथा भेगा पडणे, रस्त्याची लवकर झीज होणे असे दुष्परिणाम दिसून येतात व परिणामी रस्ता लवकर खराब होतो." नरेंद्र हगवणे, स्थापत्य विशारद, किरकटवाडी.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कामाची गुणवत्ता राखली जाईल याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग दक्ष आहे. तयार करण्यात आलेल्या रस्त्यावर आवश्यकतेप्रमाणे पाणी मारण्यास ठेकेदारास सांगितले जाईल.-अश्विनी भुजबळ, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: contractor's negligence regarding ongoing work on sinhagad road