पुणे शहरात कोरोना बूस्टर डोसच्या मागणीत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona booster dose
पुणे शहरात कोरोना बूस्टर डोसच्या मागणीत वाढ

पुणे शहरात कोरोना बूस्टर डोसच्या मागणीत वाढ

पुणे - शहरात गेल्या चार दिवसांमध्ये १८ ते ५९ वर्षे वयोगटातील १९ हजार नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लशीचा बूस्टर डोस घेतला. पावसाने उघडीप दिल्याने लसीकरण केंद्रांवर जाऊन लस घेणाऱ्या नागरिकांची गर्दी वाढत असल्याचे निरीक्षण महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी नोंदविले.

शहरात गेल्या आठवड्यात संततधार पाऊस पडत होता. जोरदार पावसाला सुरुवात होईपर्यंत शहरात चार ते पाच हजार जण केंद्रावर जाऊन लस घेत होते. पावसामुळे लसीकरणाला फटका बसला. याच दरम्यान कोरोना प्रतिबंधक लशीच्या बूस्टर डोसची कालमर्यादा नऊ महिन्यांवरून तीन महिन्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय केंद्राने घेतला. त्या पाठोपाठ १८ ते ५९ वर्षे वयोगटातील नागरिकांना बूस्टर डोस निःशुल्क देण्याचीही घोषणा झाली.

पुणे महापालिकेतर्फे १५ जुलैपासून बूस्टरची मोफत डोस सुरू केला. थांबलेला पाऊस, लशीचा कमी केलेला कालावधी, ओसरलेला पावसाचा जोर आणि निःशुल्क देण्यात येणारी लस यामुळे गेल्या पाच दिवसांपासून शहरातील लसीकरण केंद्रावर गर्दी वाढल्याचेही खात्यातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

कुठे मिळेल लस?

  • शहरातील सर्व नागरिकांना घराजवळील महापालिकेच्या दवाखान्यात हा बूस्टर डोस मोफत उपलब्ध केला आहे. कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन्ही लशींचा मुबलक साठा यासाठी करण्यात आला आहे.

  • महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांमधील ६८ दवाखान्यांत ही लस उपलब्ध केली आहे.

बूस्टर डोस

तारीख घेतलेले डोस

१५ जुलै २,८२८

१६ जुलै ६,३४०

१७ जुलै ०

१८ जुलै ५,१८६

१९ जुलै ४,८१७

कोणाला घेता येईल?

  • कोरोना प्रतिबंधक लशीचा दुसरा डोस घेतलेल्या तारखेपासून सहा महिने किंवा २६ आठवडे पूर्ण झालेल्या नागरिकांना लस घेता येईल.

  • गेल्या तीन महिन्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेला नसावा.

कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस घेऊन सात महिने झाले होते. आता बूस्टर डोस घेण्यासाठी आणखी दोन महिने वाट बघावी लागणार होती. पण, केंद्राने बूस्टर डोसचा कालावधी नऊ महिन्यांवरून सहा महिन्यांपर्यंत कमी केल्याने पहिल्या दिवशी जाऊन बूस्टर डोस घेतला.

- केतकी फडतरे, गृहिणी

बूस्टर डोस घेण्यासाठी पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. दररोज चार ते पाच हजार डोस गेल्या दोन दिवसांमध्ये देण्यात आले आहेत. ज्या नागरिकांचा कोरोना प्रतिबंध लशीचा दुसरा डोस राहिला आहे, त्यांनी तो तातडीने घ्यावा. तसेच, बूस्टर डोसला पात्र असलेल्यांसाठी महापालिकेच्या रुग्णालयात तो उपलब्ध केला आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १५ जुलै ते ३० सप्टेंबर यादरम्यान ही लसीकरण मोहीम सुरू राहील.

- डॉ. सूर्यकांत देवकर, लसीकरण अधिकारी, महापालिका