पुण्यात ६४० रुग्णांना कोरोनाचा संसर्ग; तर एवढे झाले कोरोनामुक्त

CoronaVirus
CoronaVirus

पुणे - पुण्यात ६४० रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान मंगळवारी झाले. दिवसभरात सापडलेल्या बाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आज जास्त होती. पुण्यात ६७२ कोरोनामुक्त रुग्णांवर उपचार करून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत १४ हजार ४११ बाधित ठणठणीत बरे झाले आहेत. दरम्यान, दिवसभरात २१ जणांचा करोनामुळे मृत्यु झाला आहे.

शहरात गेल्या आठ दिवसांपासून रोज बाधितांचा आकडा साडेआठशेच्या घरात नोंदला जात होता. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधीत रुग्णांचा आकडा २३ हजार २१ पर्यंत वाढला आहे. दरम्यान, आज (ता.७) दिवसभरात ३ हजार ४६७ संशयीत व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले. तर पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नव्याने सुरू केलेल्या रॅपीड ॲन्टीजेन तपासणी दिवसभरात ३८६ इतकी करण्यात आली आहे. सद्यस्थितीत शहरातील विविध रूग्णालयात ७ हजार ८५९ बाधितांवर उपचार सुरू आहेत.त्यातील ३८५ बाधितांची प्रकृती चिंताजनक असून, ६३ जणांना व्हेंटीलेटर लावण्यात आला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरीत संख्या पाच हजारांच्या पुढे
पिंपरी - शहरातील पाच जणांचा मंगळवारी दिवसभरात कोरोनामुळे मृत्यू झाला. एकूण बाधितांची संख्या पाच हजार ३४२ झाली. दिवसभरात ४०८ जणांना संसर्ग झाला असून, २३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 

कोरोना संशयिताचा मृत्यू
बारामती - डोर्लेवाडी (ता. बारामती) येथील ज्येष्ठ नागरिकाचा आज मृत्यू झाला. ते कोरोना संशयित असून, त्यांच्या घशातील स्वॅब तपासणीचा अहवाल अद्याप आलेला नसल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. या ज्येष्ठास त्रास होत होता. 

पॉझिटिव्ह रुग्णाचा गोंधळ
पिंपरी - कोरोना पॉझिटिव्ह असतानाही आपण नसल्याचा कांगावा करीत बदनामी करणाऱ्या व्यक्तीविरोधात तक्रार देण्यासाठी एक रुग्ण थेट पोलिस ठाण्यात शिरला. ठाणे अंमलदारांकडे तक्रार घेण्याचा तगादा लावत पोलिस ठाण्यात सर्वत्र फेरफटका मारत गोंधळ घातला. तो पॉझिटिव्ह असल्याचे समजल्यानंतर ठाण्यातील पोलिसांच्या पायाखालची अक्षरशः: जमीनच सरकली. हा प्रकार मंगळवारी (ता. ७) सायंकाळी देहूरोड पोलिस ठाण्यात घडला. 

देहूरोडमधील एक जण पॉझिटिव्ह असताना रिक्षातून फिरत होता. स्थानिक नागरिकांनी याबाबत रुग्णालय प्रशासनाला कल्पना दिली. त्याचा शोध सुरू केला. मात्र, आपण पॉझिटिव्ह नसतानाही काही जण आपली बदनामी करीत असल्याचा कांगावा करीत त्या व्यक्तीने थेट देहूरोड पोलिस ठाणे गाठले. तक्रार देण्यासाठी तो ठाणे अंमलदारांच्या खिडकीसमोर उभा राहिला. तो पॉझिटिव्ह असल्याचे कळताच पोलिसांची धांदल उडाली. त्याला तातडीने ठाण्याच्या बाहेर घेण्यात आले. तेथील पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह त्यालाही पीपीई कीट घालण्यात आले. देहूरोड कॅन्टोन्मेंट रुग्णालयाला संपर्क साधण्यात आला. मात्र, त्याठिकाणी जागा उपलब्ध नसल्याचे सांगितल्याने पोलिसांपुढे मोठा प्रश्‍न निर्माण झाला. अखेर पोलिस बंदोबस्तात तळेगाव येथील रुग्णालयात त्याला दाखल करण्याचे निश्‍चित झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com