esakal | बारामतीकरांनो, काळजी घ्यायलाचा हवी, कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

corona infection

बारामतीकरांनो, काळजी घ्यायलाचा हवी, कारण...

sakal_logo
By
मिलिंद संगई, बारामती

बारामती : दहा दिवसांहून अधिक काळ उलटूनही बारामतीतील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या सातत्याने वाढतच असल्याने सर्वांचीच चिंता वाढू लागली आहे. लॉकडाऊन करुनही कम्युनिटी स्प्रेड थांबलेला नसून या वाढणाऱ्या रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देताना प्रशासनाची दमछाक होऊ लागली आहे. बारामतीत काल केलेल्या (ता. 17) 749 तपासण्यांपैकी आज 307 जण पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान तब्बल 305 नमुन्यांचे अहवाल अजूनही प्रतिक्षेत आहेत. एकूण केलेल्या तपासण्यांपैकी पॉझिटीव्ह येण्याचे प्रमाण आज 41 टक्क्यांवर पोहोचल्याने प्रशासन चिंतेत आहे. अशाच पध्दतीने जर लोक पॉझिटीव्ह येत राहिले तर आरोग्य यंत्रणा कोलमडून जाईल अशी भीती आता व्यक्त होत आहे. बारामतीतील तपासणी केलेल्या शंभर जणांच्या नमुन्यांपैकी तब्बल 40 नमुने पॉझिटीव्ह येत असल्याने झपाट्याने रुग्णसंख्या वाढू लागली आहे.

हेही वाचा: शेतकऱ्यांच्या अडचणीत भर; दुधाचे खरेदीदर गडगडले

बारामतीतील रुग्णसंख्येचा आकडा झपाट्याने 15 हजारांच्या दिशेने जात आहे. बारामतीत कालपर्यंत 13681 रुग्णसंख्या होती, त्या पैकी 10549 रुग्ण बरे झाले होते तर आजपर्यंत 210 लोक यात मृत्यूमुखी पडले आहेत.

नातेवाईक रडकुंडीला-अनेक रुग्णांचा एचआरसीटीचा स्कोअर हा पंधराहून अधिक असून त्यांना रेमडेसिवीर इंजेक्शनच उपलब्ध होत नसल्याने नातेवाईक रडकुंडीला आले आहेत. अनेक मान्यवरांना सातत्याने फोनवरुन या इंजेक्शनच काहीतरी बघा हो...नाहीतर आमचा पेशंट दगावेल, अशी आर्त याचना केली जात आहे. रुग्णसंख्या झपाटयाने वाढत असताना दुसरीकडे तुलनेने या इंजेक्शनचा पुरवठा तोकडा असल्याने अनेकांच्या जीवावर बेतेल की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

हेही वाचा: कोरोनाच्या नियंत्रणासाठी अठरा वर्षांवरील सर्वांचं लसीकरण हाच पर्याय - अमोल कोल्हे

तीनशेच्या टप्प्यात दररोज वाढणा-या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजन बेडवरही मर्यादा येऊ लागल्याने प्रशासन अधिक चिंतेत आहे. शासकीय वैद्यकीय सर्वोपचार रुग्णालयातील 150 खाटांच्या ऑक्सिजन पाईपलाईनचे काम सुरु असून ते पूर्ण झाल्यावर काहीसा दिलासा मिळेल, पण तो पर्यंत रुग्णांना ऑक्सिजनचे बेड कोठून दयायचे असा यक्षप्रश्न प्रशासनापुढे आहे. दरम्यान, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी आज बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला. बारामतीतील काही खाजगी डॉक्टरांच्या सेवा कोविड केअर सेंटरसाठी अधिग्रहीत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले.

हेही वाचा: कोरोनाच्या नियंत्रणासाठी अठरा वर्षांवरील सर्वांचं लसीकरण हाच पर्याय - अमोल कोल्हे

कोविड केअर सेंटरमधील क्षमताही दिवसागणिक वाढवली जात असताना रुग्ण संख्याच वेगाने वाढू लागल्याने या यंत्रणेवरही ताण येऊ लागला आहे ही वस्तुस्थिती आहे. बारामतीत काहीही झाले तरी रुग्णांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अधिकारी व पदाधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिवाचे रान करीत आहेत. आम्ही आमच्या सर्व क्षमतांचा पूर्ण वापर करुन सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न करतो आहोत. –किरण गुजर, ज्येष्ठ नगरसेवक बारामती.