esakal | शेतकऱ्यांच्या अडचणीत भर; दुधाचे खरेदीदर गडगडले
sakal

बोलून बातमी शोधा

Milk

शेतकऱ्यांच्या अडचणीत भर; दुधाचे खरेदीदर गडगडले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी लागू केलेल्या कडक निर्बंधांचा दूध व्यवसायाला जबर फटका बसला आहे. ऐन उन्हाळ्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी सुमारे ३० टक्क्यांनी कमी झाली आहे. परिणामी, चालू आठवड्यात दूध पावडर आणि बटरच्या (लोणी) दरात प्रति किलो ५० रुपयांनी घट झाली. यामुळे दूध पावडर उत्पादक प्रकल्पांनी दूध खरेदीदरात प्रति लिटर पाच रुपयांची कपात केली आहे. यामुळे दूध खरेदीदर पुन्हा २५ रुपयांवर आला आहे.

हेही वाचा: कोरोनामुळे माजी मुख्यमंत्र्यांचेही हाल; उपचारासाठी मिळेना बेड

दरवर्षी उन्हाळ्यात दुधाचे खरेदीदर वाढतात. कारण, उन्हाळ्यामुळे बेकरी उत्पादने, कुल्फी, दही, ताक, लस्सीची मागणी वाढत असते. या पदार्थांच्या निमिर्तीसाठी दूध, दूध पावडर आणि बटरची खरेदी वाढत असते. यंदा मात्र या खरेदीत उन्हाळ्यात ३० टक्क्यांनी घट झाली आहे. मागणी कमी झाल्याने दूध पावडर व बटरचे भाव घसरल्याचे महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी सांगितले.

राज्यात दूध पावडरचे दर वाढले की दूध दर वाढतात आणि पावडरचे दर कमी झाले की दूध खरेदीदर कमी होण्याची पद्धतच पडली आहे. यामुळे दूध उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ लागले आहे. राज्यातील गाईच्या दुधाचा खरेदीदर सर्व खासगी व सहकारी दूध संघांनी एकसमान ठेवण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार गाईच्या दुधाला प्रति लिटर ३० रुपये दर देण्यावर सर्व दूध संघांचे एकमतही झाले होते. हा निर्णयही हवेत विरला आहे. दोन आठवड्यांपूर्वी दूध पावडरचा दर प्रतिकिलो २८० रुपये तर, बटरचा दर प्रतिकिलो ३३० रुपये होता. आता पावडरचे दर प्रतिकिलो २३० तर, बटरचा दर २८० रुपये झाला आहे.

हेही वाचा: पुण्यात नमाजसाठी मशिदीत एकत्र येण्यावर निर्बंध

राज्यातील दूध संस्थांकडून नेहमी दूध खरेदीदरात चढ-उतार होत असल्याने राज्यातील दूध संस्थांवरील शेतकऱ्यांचा विश्‍वास उडू लागला आहे. हे थांबण्याची गरज आहे. दुसरीकडे परराज्यातील संस्था कमी दर देऊनही शेतकऱ्यांच्या मनात आपले स्थान निर्माण करू लागल्या आहेत. ही राज्यातील दूध संस्थांसाठी धोक्याची घंटाच आहे. संचारबंदीमुळे खूप अडचणी वाढल्या आहेत.

- प्रकाश कुतवळ, सचिव, राज्य दूध उत्पादक कल्याणकारी संघ