esakal | कोरोनानंतर नाकात होतोय बुरशीजन्य आजार; दुर्मिळ रोगावरील उपचारांसाठी ‘एसओपी’
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus

कोरोनानंतर नाकात होतोय बुरशीजन्य आजार; दुर्मिळ रोगावरील उपचारांसाठी ‘एसओपी’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - पावावर वाढणाऱ्या बुरशीप्रमाणे नाकामध्ये वाढणाऱ्या ‘म्युकरमायकॉसीस’ या अति दुर्मिळ बुरशीजन्य आजार आता कोरोनातून बऱ्या झालेल्या रूग्णांमध्ये वाढत आहे. प्रामुख्याने मधुमेह असलेल्या रुग्णांना उपचारादरम्यान ऑक्सिजन आणि जास्त प्रमाणात स्टेरॉईड दिले गेले आहे. अशा रुग्णांमध्ये या जीवघेण्या आजाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यांच्यावर उपचार कसे करावे, यासाठी एक आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) विकसित करण्यात येत आहे, अशी माहिती पुण्यातील नेत्ररोग तज्ज्ञ आणि संशोधक डॉ. नताशा पहुजा यांनी दिली.

‘म्युकरमायकॉसीस’ या बुरशीजन्य आजाराचे वेळेत निदान न झाल्यास उपचार करणे दुरापास्त होते. विशेष म्हणजे या बद्दल अजूनही बहुतेक डॉक्टरांमध्ये अनभिज्ञता दिसत आहे. यामुळे, असे रूग्ण समोर आल्यावर डॉक्टरांनी नक्की काय करावे आणि उपचाराची पद्धत कशी असावी यासाठी आदर्श कार्यप्रणाली विकसित करण्यात येणार आहे. डॉ. पहुजा म्हणाल्या,‘‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अशा रुग्णांची संख्या वाढली आहे. माझ्या सारख्या बहुतेक डॉक्टरांनी हे निरीक्षण नोंदविले आहे. यामध्ये वेळेत निदान होणे गरजेचे आहे. तसे झाल्यास उपचार करणे आपल्या हातात राहील. सध्या आमच्या संपर्कातील डॉक्टरांशी चर्चा करून आम्ही ही प्रणाली विकसित करून, सर्व डॉक्टरांमध्ये वितरित करू.’’

हेही वाचा: पुणे विद्यापीठाला दुसऱ्या लाटेचा फटका, सहा जणांचा बळी

‘म्युकोरमायकॉसीस’ची लक्षणे -

- चेहऱ्यावर सूज येणे, गाल दुखणे

- डोळे दुखणे, डोळ्यांना सूज येणे

- दिसण्यास कमी होते

- डोके दुखणे, नाक चोंदणे

- रक्ताळ किंवा काळसर जखम

अशी घ्या काळजी

- एक डोळा बंद करुन टीव्हीवरील अक्षरे वाचण्याचा प्रयत्न करा, जर दिसणे कमी झाले असेल तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधा

- रोग प्रतिकारशक्ती संतुलीत होईल यासाठी प्रयत्न करा

- म्युकोरोमायकॉसीस या बुरशीच्या प्रसाराचा वेग जास्त आहे त्यामुळे उपचारासाठी टाळाटाळ करू नका

- रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलीत करा, रक्तदाब नियंत्रित करा, रोगप्रतिकारशक्ती वाढेल असा आहार घ्या

कोरोना उपचारादरम्यान अतिरिक्त

प्रमाणात स्टेरॉईड आणि ॲन्टीबायोटीकचा वापर झाल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. पर्यायाने रोगप्रतिकारशक्ती कमी होत म्युकोरमायकोसिसचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते. मी स्वतः आठ-दहा रुग्णांवर उपचार केले असून, कोरोनातून बरे झालेल्या. लोकांनीही आरोग्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

- डॉ. सचिन गांधी, कान-नाक-घसा तज्ज्ञ, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल.

माझे वडील ३५ वर्षांपासून आरोग्य सेवेत आहे. त्यांनी त्यांच्या संपूर्ण करिअर मध्ये फक्त एक रूग्ण म्युकरमायकॉसिस या बुरशीजन्य आजाराचा पाहिला होता. मात्र, मी गेल्या काही दिवसात २० ते २५ रुग्णांवर उपचार करत आहे.

- डॉ. नताशा पहुजा, नेत्ररोग तज्ज्ञ आणि संशोधक

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

loading image