...अन् 'या' गावात मुंबईतून आले दिडशे लोक

श्रीकृष्ण नेवसे
रविवार, 24 मे 2020

- सासवडनजिक कोडीतला सापडला पाॅझीटिव्ह रुग्ण. 
- बाधीत मुंबईहून कुटुंबासह आलेला; गावात दिडशेजण मुंबईचे.. डोकेदुखी वाढण्याचे संकेत

सासवड (पुणे) : कोडीत खुर्द (ता. पुरंदर) गावात मुंबईतून आलेल्या व शाळेत क्वारंटाइन असलेल्या एका कुटुंबातील तरुणास कोरोनाची बाधा झाल्याचे आज स्पष्ट झाले. हे कुटुंब मुंबईतून ता. 19 रोजी मुलगावी कोडीतला आले होते. दरम्यान, त्यास त्रास होत असल्याने काल सासवडला कोवीड केअर सेंटरला आणून स्वॅप तपासणीस घेतला; त्याचा रिपोर्ट आज सायंकाळी पाॅझिटीव्ह आला. 

पुरंदर तालुक्याच्या तहसीलदार रुपाली सरनौबत यांनी आज सायंकाळी ही माहिती दिली. दरम्यान पुरंदर तालुक्यातील कोरोनामुक्त एक व कोरोना पाॅझीटिव्ह तीन अशा चार रुग्णांची आतापर्यंत नोंद झाली आहे. कोडीतचा हा रुग्ण कुटुंबीयांसह मुंबईतील भायखळा भागात किराणा दुकान चालवित होता. त्याच्याशिवाय कोडीत खुर्द व कोडीत बुद्रुक या जोडगावात दिडशे लोक.. मुंबईतून व विविध बाहेरगावाहून आले आहेत. ते शाळेत क्वारंटाइन आहेत. पण मुळचे गावकरी त्यांना जेवण देण्यानिमित्त व भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात भेटत असल्याने संसर्गाचा धोका त्या गावांसह लगतच्या सासवडला अगदी उंबरठ्यावर आहे.

कालच येथील सासवडनजिकच्या सुपे खुर्द  (ता.पुरंदर) गावातील एका कंपनी कामगाराचा कोरोना संसर्गातून रिपोर्ट पाॅझीटिव्ह आला होता. त्या सुप्याचा रस्ता सासवडमधून जातो व अंतर दोनच कि.मी. आहे. म्हणजेच 60 हजार लोकसंख्येच्या सासवड शहरातील नागरिकांना हा मोठाच इशारा होता. तर कोडीत गावही सासवडलगतच आहे. त्यामुळे येथील डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत.

एकुणच कोरोनामुक्त पुरंदर तालुका आता तीन पाॅझीटिव्ह रुग्णांसह बाधीत ठरला आहे. जेजुरीतील एक रुग्ण बराही झाला आहे. मुंबईतून आलेले लोक व पुण्यात जाणारे व येणारे नोकरदार ही पुरंदरसाठी पुढील काळात मोठी डोकेदुखी ठरणार असल्याचे वीर, सुपे व कोडीतच्या रुग्णांतून स्पष्ट झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patient found at Kodit Khurd