इंदापूरकरांनो सावधान, या गावांमध्ये आढळले कोरोनाचे रुग्ण

corona1
corona1

पुणे : इंदापूर तालुक्यातील भिगवण शहरातील थोरातनगरमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला असून, कळंबजवळील लालपुरी येथील चार वर्षाच्या मुलीला व तीन वर्षाच्या मुलाला, तर पळसदेव येथे मजूर पुरवठादार व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  

भिगवण : इंदापूर तालुक्यातील भिगवण स्टेशन, मदनवाडीपाठोपाठ भिगवण शहरातील थोरातनगरमध्येही कोरोनाचा रुग्ण आढळून आला. त्यामुळे भिगवण परिसराला कोरोनाचा धोका वाढला आहे. सध्या भिगवण स्टेशनला ५, मदनवाडी येथे १, अकोले येथे १० कोरोनाचे अॅक्टीव्ह रुग्ण आहेत, तर रुग्णांच्या संपर्कातील तपासणी केलेल्यांचे अहवाल येणे बाकी आहे.
    
कोरोनाच्या सुरुवातीपासूनच काळजी घेतल्यामुळे मागील चार महिन्यांमध्ये भिगवण शहर कोरोनामुक्त होते. परंतु, रविवारी (ता. १९) येथील थोरात नगर येथील एका व्यावसायिकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. भिगवण शहराबरोबरच भिगवण स्टेशन येथे ५, मदनवाडी येथे १, तर अकोले येथे १० अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. या गावांतील लोकांचा भिगवण शहरांशी बाजारपेठेच्या निमित्ताने मोठा संपर्क असतो. भिगवण शहरासह आजुबाजुच्या खेडेगावांतही कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यामुळे भिगवणला कोरोनाचा धोका वाढला आहे.

कोरोना रुग्ण सापडल्यामुळे थोरातनगर परिसर सॅनीटाईज करण्यात आला. भिगवण शहर कंटेन्मेंट झोन जाहिर करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आज बाजारपेठ बंद होती. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय पुढील आदेश येईपर्यंत बंद राहतील. नागरिकांनी घाबरुन न जाता प्रशासनास सहकार्य करावे, असे भिगवणच्या सरपंच अनिता धवडे यांनी सांगितले. 

कळस : पळसदेव (ता. इंदापूर) येथे मजूर पुरवठादार व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावात खळबळ उडाली आहे. 

संबंधित रुग्ण लोणी देवकर येथील एमआयडीसी परिसर व दौंडमधील विविध ठिकाणी मजूर पुरवठा करत असल्याची माहिती समोर आली आहे. या व्यक्तीच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्याचे काम आरोग्य कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. सदर रूग्ण बिहारी असून, येथील इमारतीमध्ये पत्नी, मुलगा व भावाबरोबर भाडेकरू म्हणून वास्तव्यास आहे. त्यामुळे या तिघांना कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. पळसदेव गावासह येथील बांडेवाडी गाव प्रतिबंधित तर काळेवाडी व माळेवाडी बफरझोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीने गावातील बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

संबंधित रूग्णाला गेल्या आठवड्यात ताप येत असल्याने इंदापूर येथील खासगी दवाखान्यात दाखल झाला होता. तेथील डॉक्टरांनी कोरोना तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला. त्यामध्ये सदर व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये मजूर पुरवठा करण्याबरोबरच दौंड परिसरातील अनेक ठिकाणी मजूर पुरवठा करत असल्याचे समोर आले आहे. यामुळे या व्यक्तीच्या संपर्कातील 15 व्यक्तींना होम क्वारंटाइन करण्यात आले असून, आणखी संपर्कातील व्यक्तींची माहिती घेण्यात येत असल्याचे तालुका आरोग्य विस्तार अधिकारी डॉ. दिलीप जगताप यांनी सांगितले.

वालचंदनगर : कळंब (ता. इंदापूर) जवळील लालपुरी येथील चार वर्षाच्या मुलीला व तीन वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

येथील एक व्यक्तीला चार दिवसांपूर्वी कोरोना लागण झाली आहे. त्याच्या संपर्कातील व कुटुंबातील ९ जणांचे स्वॅब घेण्यात आले. कुटुंबातील दोन चिमुरड्या मुलांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये चार वर्षाच्या मुलीचा व तीन वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. मुलांवर इंदापूरमधील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. इंदापूर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असल्याचे लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जीवन सरतापे यांनी सांगितले. 
  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com