esakal | कोरोना रुग्णांचे होणार आता ऑडिट; महापालिकेचा निर्णय

बोलून बातमी शोधा

Corona Patient

कोरोना रुग्णांचे होणार आता ऑडिट; महापालिकेचा निर्णय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - रुग्णांचा रोजचा आकडा साडेचार-पाच हजारांच्या घरात राहतोय. उपचाराच्या आशेने हॉस्पिटलची दारेही रुग्णांनी ‘फुल्ल’ दिसतायेत. काही केल्या बेड वाढेनात अन् ते मिळेनासे झालेत. त्यामुळे आता रुग्णांचे ‘ऑडिट’ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. गरज नसतानाही १२-१५ दिवस उपचार घेणाऱ्या, ठणठणीत बरे होऊनही भीतीपोटी बेड न सोडलेल्या रुग्णांवर ‘वॉच’ ठेवून त्यांचे लगेचच समुपदेशन करीत, बेड मोकळे करण्याचा नवा प्रयोग महापालिका राबवीत आहे. महापालिका आणि खासगी रुग्णालयांत हा उपाय असेल.

व्हेंटिलेटर, ऑक्सिजनसह रुग्णालयांतील अन्य उपचारांसाठी गरज नसलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. मात्र, या ठिकाणी रुग्ण डॉक्टरांच्या देखरेखीखाली असतील. त्यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) वसतिगृहात ही सोय केली आहे. शहरातील रोजच्या नव्या रुग्णांपैकी १० ते १२ टक्के रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागत असल्याचे आकडे आहेत. म्हणजे आताच्या रुग्णसंख्येनुसार चारशे-साडेचारशे रुग्ण हॉस्पिटल येतात. त्यातील ५० टक्के रुग्णांना ऑक्सिजन, अतिदक्षता विभागातील (आयसीयू) उपचाराची गरज भासत असल्याचे आरोग्य खात्याची माहिती आहे. अशा स्थितीत अत्यवस्थ रुग्णांना बेड मिळत नसल्याने काही जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तरीही रुग्णांना उपचार मिळत नाहीत.

हेही वाचा: 'जम्बो'मध्ये ६० टन प्राणवायूची बचत; छोट्या उपाययोजना ठरल्या फायदेशीर

आरोग्य खात्याने केला अभ्यास

कोरोना साथीत बहुतांशी रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होत असले, तरी त्या सगळ्यांनाच तशी गरज आहे का?, या दृष्टीने आरोग्य खात्याने अभ्यास केला. बेड मिळणार नाही, या चिंतेतून काही रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होत असल्याचे निरीक्षण आहे. तर, घरी राहिल्याने न्यूमोनिया होईल, त्याचे प्रमाण वाढल्यावर अचानक बेड, रेमडेसिव्हिर मिळणार नसल्याच्या शक्यतेने रुग्ण, त्यांचे नातेवाईक सौम्य लक्षणे असतानाही हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे अन्य अत्यवस्थ रुग्णांना बेड मिळण्यात अडचणी येत असल्याचेही सांगण्यात आले.

रुग्ण दाखल झाल्यापासून कोणते उपचार दिले, त्याचा कालावधी, त्यानंतर रुग्णाची प्रकृती आणि आणखी उपचाराची गरज आहे का, या बाबी तपासल्या जाणार आहेत. तशा सूचना महापालिकेच्या डॉक्टरांना दिल्या असून, यापुढे खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार आणि रुग्णांचे ‘ऑडिट’ होईल. या प्रयोगानंतर रोज शंभर-सव्वाशे बेड मोकळे होऊ शकतील.

- रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त महापालिका

आरोग्य खात्याची निरीक्षणे

  • कोरोनामुक्त होऊनही २०-२५ दिवस उपचार सुरू

  • ऑक्सिजनची पातळी वाढूनही त्याचा वापर

  • डिस्चार्जनंतर घरातील लोकांना त्रास नको म्हणून रुग्णालयांत राहणे

  • डॉक्टरांच्या देखरेखीला पसंती

  • लक्षणे नसणे, सौम्य लक्षणे असतानाही बेड मिळविणे