esakal | रेमडेसिव्हिरच्या रिकाम्या बाटल्या ‘बोलणार’
sakal

बोलून बातमी शोधा

Remdesivir

जमा करण्याचा डॉक्टरांना आदेश; काळाबाजार रोखण्यासाठी महापालिकेचे पाऊल

रेमडेसिव्हिरच्या रिकाम्या बाटल्या ‘बोलणार’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - टंचाईत रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार होऊ नये आणि अत्यवस्थ रुग्णांपर्यंत ते पोचावे, यावर महापालिकेने भन्नाट कल्पना आखली आहे. या इंजेक्शनच्या वापरानंतर त्याच्या रिकाम्या वायल म्हणजे, बाटली जमा करण्याचा आदेश महापालिकेने डॉक्टरांना दिला आहे. रुग्णांच्या नावासह वायल, त्यावरील ‘स्ट्रीप’ही देण्याची तंबीच डॉक्टरांना दिली आहे. यामुळे नेमक्या आणि गरजू रुग्णांना इंजेक्शन मिळेल, अशी आशा आहे.

पहिल्या टप्प्यात जम्बो हॉस्पिटल, कोविड हॉस्पिटलसह महापालिकेच्या सहा रुग्णालयांसाठी आदेश काढण्यात आला आहे. त्याचे पालन न करणाऱ्या डॉक्टरांना नोटिसा बजावून खुलासा मागविण्याची व्यवस्था महपालिकेने केली आहे. जम्बो, कोविड हॉस्पिटलसह डॉ. नायडू, दळवी, खेडेकर, लायगुडे रुग्णालयांत सुमारे दीड हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील चारशेहून अधिक रुग्णांची प्रकृती अत्यवस्थ असून, काहीजणांना रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा वापर केला जात आहे.

हेही वाचा: 'सिर्फ तीस मिनिट...',खाकी वर्दीतल्या देवदूताने वाचवले कोरोनाबाधितांचे प्राण

म्हणून घेतला निर्णय

- गेल्या काही दिवसांत रेमडेसिव्हिरचा तुटवडा

- काळाबाजार होत असल्याच्या वाढत्या घटना

- जादा पैशांत इंजेक्शन विकल्याचे प्रकार उघडकीस

- महापालिकेच्या आरोग्य खात्यातील काही कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास

- यामुळे सावध महापालिका प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरवात

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

डॉक्टरांना हे करावे लागणार

- रेमडेसिव्हिर वापरलेल्या रुग्णांची माहिती

- त्यांची प्रकृतीची सविस्तर माहिती

- रिकाम्या वायल, त्यावरील ‘स्ट्रीप’ आरोग्य खात्याकडे जमा

रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या वायलवरील क्रमांकावरून त्याच्या वापराची नोंद ठेवली जात आहे. रुग्णांच्या तपासण्या आणि त्यांच्यावरील उपचाराच्या अहवाल फाइलवर वायलवरील ‘स्ट्रीप’ लावण्याचे बंधन आहे आणि त्यानंतर ती रिकामी वायल महापालिकेत आणून जमा करायची आहे.- रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

हेही वाचा: ''मला साधा मेसेज करता येत नाही, मी ट्विट कसे करणार?''

खासगी रुग्णालयांत बहुतांशी रुग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्याचे प्रिस्क्रिप्शन देण्यात येत आहे. त्यावर आक्षेप घेत, महापालिकेने आपल्याकडील रुग्णांना गरजेनुसारच इंजेक्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जम्बो, कोविड हॉस्पिटल आणि अन्य रुग्णालयांत पुरेशा प्रमाणात इंजेक्शन दिले आहेत. परंतु, त्यांचा योग्य वापरा व्हावा, यासाठीचा आग्रह आहे. - डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, महापालिका पुणे

loading image