कोरोनामुळे आर्थिक आणि कौटुंबिक पातळीवर करावा लागला संघर्ष

Corona-Period-Lifestyle
Corona-Period-Lifestyle

पुणे - कोरोनाने काय दिल.. तर आर्थिक आघाडीवर संघर्ष आणि कौटुंबिक पातळीवर नात्यांची घट्ट वीण! बुडालेला व्यवसाय, गेलेली नोकरी, कुटुंबाचा खर्च, बॅंकांचे हप्ते, रोजच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न, मुलांच्या शिक्षणाचे शुल्क, अशा एक ना अनेक अडचणींचा गेली वर्षभर सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे अशा अडचणींमध्ये खांद्या ला खांदा लावून उभे राहिलेले कुटुंब आणि मित्रमंडळींनी जगण्याचा नवा दृष्टिकोन प्रदान केला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउनला वर्षपूर्तीनिमित्त वेगवेगळ्या आर्थिक स्तरातील कुटुंबांशी संवाद साधले असता, त्यांनी अशा सामुहीक भावना व्यक्त केल्या. नवी सांगवी परिसरात राहणारे राजेंद्र देशमुख सांगतात, ‘नवरा आणि बायको दोघांच्याही नोकऱ्या गेल्यामुळे आम्ही घरगुती व्यवसायाला सुरवात केली. केक बनविणे, घरगुती मेस, असे छोटे मोठे व्यावसाय सुरू केले. तर दुसरीकडे घर खर्च निम्म्यावर आणला. या काळात कुटुंबाने मला खंबीर साथ दिली. कोरोनाने आम्हाला जगण्याच्या वास्तव समोर आणले.’ माझी प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम या काळात काढून घेतली आणि त्यावर उदरनिर्वाह चालविला. सध्या मी सुरक्षा रक्षकाची नोकरी धरली असून त्यावर घर चालते, असे धनकवडीचे योगेश जाधव (नाव बदललेले) सांगतात. 

घरातल्या गृहिणींनी घरखर्च चालविण्यासाठी छोटे मोठे व्यवसाय चालू केल्याचे चित्र या काळात सर्वाधिक दिसले. अलका काळोखे सांगतात, ‘लॉकडाउनचा कालावधी सर्वांसाठीच आव्हानात्मक होता. घर खर्च भागविण्यासाठी अनावश्यक गोष्टी कमी केल्या. त्याचबरोबर घरातून काही व्यवसाय करता येईल का याचा आढावा घेतला. मैत्रिणीच्या मदतीने गृहोपयोगी वस्तूंची विक्री केली. या निमित्ताने कुटुंबातील सर्वच सदस्य भावनिकदृष्ट्या जवळ आले.’ लॉकडाउनमुळे जादूचे प्रयोग सोडून वडापावची गाडी टाकण्याची वेळ ज्यांच्यावर आली असे प्रसाद कुलकर्णी म्हणाले, ‘जेंव्हा लॉकडाउनची घोषणा झाली. तेव्हा मला तातडीने लोकांचे घेतलेला ॲडव्हान्स परत करावा लागला. पुढचे सगळे कार्यक्रम रद्द झाले. अक्षरशः मित्रांच्या मदतीने वडापावची गाडी सुरू केली. वीस वर्षाहून अधिक काळ काम करूनही वर्षभर घरी बसून खाऊ शकू एवढे अर्थार्जन मला करता आले नाही. मात्र या काळात कुटुंब आणि मित्रांनी दिलेला पाठिंबा महत्त्वपूर्ण ठरला.’

कोरोनाच्या वर्षभरात -
- नोकरी गेली किंवा व्यवसाय बंद पडल्यामुळे बहुतेक कुटुंबांना मोठी आर्थिक झळ सहन करावी लागली 
- बहुतेकांनी भविष्याची सुरक्षितता म्हणून जमवून ठेवलेली बचत वापरात आणली 
- गृहिणींनी घर खर्च निम्म्यावर आणला 
- सहज शक्य होतील असे व्यवसाय कुटुंबाने सुरू केले 
- एकाच वेळी दोन किंवा अधिक नोकऱ्या पत्करल्या 
- परप्रांतीयांनी व्यापलेल्या अनेक व्यवसाय व नोकऱ्या मराठी लोकांनी धरल्या 
- सुरक्षा रक्षक, खाद्यपदार्थांचा ठेला, ग्रोसरी, भाजीपाला विक्री आदी व्यवसाय सुरू केले 
- नोकरी पुन्हा सुरू होईपर्यंत मिळेल ती नोकरी आणि व्यवसाय पकडले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com