
Corona Update : बारामतीत 24 तासात 45 जण बाधित...
बारामती : कोविडच्या(COVID-19) रुग्णांचा आकडा बारामतीत झपाट्याने वाढत असून नागरिकांनी पुरेशी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. गेल्या चोवीस तासात बारामतीत तब्बल 45 रुग्ण आढळले असून हा वेग कमालीचा आहे. यातही बारामती शहरात 30 तर तालुक्यात 15 रुग्ण आढळले आहेत. शहरात गर्दीचे प्रमाण अधिक असून लोक पुरेशी काळजी घेत नसल्याने रुग्ण वाढ मोठी आहे. या पुढील काळात आता काही निर्बंध प्रशासनाला आणावे लागतील अशी चिन्हे आहेत.(Corona And Omicron Latest News)
हेही वाचा: "शरद पवारांना मुख्यमंत्र्यांनी चार्ज दिलाय का?"
तालुकयातील तीन कुटुंबातील तब्बल बारा जण पॉझिटीव्ह असून शहरातही कुटुंब बाधित होताना दिसत आहेत. बाधित होणा-यांची संख्या अधिक असली तरी रुग्णालयात जाण्याची गरज फक्त पाच टक्के रुग्णांनाच लागते असल्याने ती एक दिलासादायक बाब असल्याची माहिती डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
राज्यात मोठ्या संख्येने कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत असली तरी अजूनही बारामतीत लोक फारशी काळजी घेताना दिसत नाहीत. जमावबंदी बारामतीत फक्त कागदावरच आहे, अनेक ठिकाणी घोळक्याने लोक बिनधास्त एकत्र वावरत आहेत, बँकासह इतर अनेक संस्थांतून मोठी गर्दी उसळते आहे. पोलिसांची गस्त सातत्याने राहणे गरजेचे असून जेथे गर्दी होत असेल तेथून गर्दी कमी करण्याचे काम होण्याची गरज आहे.
हेही वाचा: देशात दिवसभरात १.६८ लाख नवे रुग्ण, ओमिक्रॉन रुग्णांची संख्या ४,४६१
बारामतीत प्रशासनाने कोविड केअर सेंटर सुरु करण्यासह इतरही जय्यत तयारी केलेली असली तरी काळजी घेऊन कोरोनाची बाधा होणार नाही या कडे अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. गर्दीची ठिकाणे निश्चित करुन संबंधितांना समज देणे प्रसंगी कारवाई करण्याची गरज आहे. प्रशासनाने या बाबत समन्वय साधून नगरपालिका, पोलिस, आरोग्य व इतरही विभागांच्या समन्वयनाने काम होण्याची गरज आहे. विनामास्क फिरणा-यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई व्हायला हवी व अँटीजेन तपासण्यांचीही संख्या वाढविण्यावर भर दिला जावा अशीही मागणी जोर धरु लागली आहे.
Web Title: Corona Update In Baramati 24 Hours 45 People Affected
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..