esakal | लहान मुलांसाठी ‘आम्ही आलो पुढे’; लस चाचणीतील बालकुमारांची भावना I Vaccination
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccine

लहान मुलांसाठी ‘आम्ही आलो पुढे’; लस चाचणीतील बालकुमारांची भावना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - लहान मुलांसाठी कोरोनाची लस अद्यापही उपलब्ध नाही. आम्ही लशीच्या चाचणीत सहभाग घेतला नसता तर कदाचित लस मिळायला अजून उशीर झाला असता. त्यामुळे एक सामाजिक कार्य म्हणून आम्ही लशीच्या चाचणीत सहभाग घेतला, अशी भावना १७-१८ वर्षांच्या मुला-मुलींनी व्यक्त केली.

अहमदाबादच्या ‘झायडस कॅडीला’ कंपनीने विकसित केलेल्या ‘झायकोव्ह-डी’ या लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लशीची चाचणी डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात झाली. त्यात सहभागी झालेल्या मुला-मुलींनी ‘सकाळ’शी बोलताना ही भावना व्यक्त केली. देशात १६ जानेवारीपासून प्रौढांचे लसीकरण सुरू झाले. मात्र, लहान मुलांना अद्यापही लस नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर लवकर लस येण्यासाठी त्याच्या चाचण्या वेळेत पूर्ण झाल्या पाहिजे. हा विचार करून लशीच्या चाचणीत सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले.

याबद्दल बोलताना डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या डॉ. शलाका आगरखेडकर म्हणाल्या, ‘‘जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात ‘डीसीजीआय’ची (ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया) मान्यता मिळाली. तिसऱ्या टप्प्यातील या लशीच्या चाचण्या होत्या. त्यामुळे १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींचा यात समावेश करण्यात आला. मार्चपासून ४७ मुलांवर ही चाचणी करण्यात आली.’’

सामान्यतः इंजेक्शन दिल्यावर हात सुजतो, डोकं जड झालं किंवा ताप आला असा कोणताही त्रास या चाचणीत सहभागी झालेल्या मुलांना झाला नाही. तसेच, इंजेक्शन दिलेल्या जागेवर लाली आली नाही. तेथे गाठ आली नाही किंवा इंजेक्शनची जागा हुळहुळी झाली नाही. त्यामुळे मुलांना कोणताही त्रास झाला नाही.

- डॉ. शलाका आगरखेडकर, डी. वाय. पाटील रुग्णालय

हेही वाचा: पुणे : अंतिम प्रभागरचना डिसेंबरमध्ये; तर आचारसंहिता जानेवारीत

मुलांच्या निवडीचे निकष

लशीच्या चाचणीसाठी आलेल्या काही लहान मुलांना कोरोना होऊन गेला होता. त्यांना त्या वेळी कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. त्यामुळे त्याचे निदान झाले नाही. मात्र, त्यांच्या शरीरात कोरोनाची प्रतिपिंडे (अँटिबॉडीज) होती. त्यामुळे ‘आरटी-पीसीआर’ आणि अँटिबॉडीज या दोन्ही गोष्टी निगेटिव्ह असलेल्या रुग्णांचा समावेश तिसऱ्या चाचणीसाठी करण्यात आला.

मोठी जोखीम

चाचणी सुरू असताना कोरोनाची दुसरी लाट सुरू होती. अशा वेळी आपल्या मुलांना घराबाहेर काढून रुग्णालयात घेऊन जाणे, हा सर्वांत मोठा धोका होता. हाच चाचणीतील मोठा अडथळा होता. पालक लस देण्यासाठी तयार होते. पण रुग्णालयात आणायची भीती पालकांना वाटत होती.

लशीचे डोस किती आहेत

एका मुलाला ०.२ मिलिलिटर लशीचा डोस देण्यात आला. ही लस एका वेळी दोन्ही हातावर ०.१ मिलिलिटर दिली जाते. त्यामुळे तो डोस ०.२ मिलिलिटर होतो. अशी प्रकारचे लशीचे तीन डोस मुलांना २८ ते ३० दिवसांच्या अंतराने देण्यात आले.

मुले म्हणतात...

आम्हाला इंजेक्शन दिले असे वाटलेच नाही. शाळेत येता-जाता एखाद्या मित्राने टोचलेल्या पेन्सिलसारखे हे इंजेक्शन वाटले. इंजेक्शन दिले हे कळत नाही.

इंजेक्शनची वैशिष्ट्ये

  • सामान्य इंजेक्शनप्रमाणे ही लस नाही. ही लस त्वचेच्या आतमध्ये दिली जाते. त्वचा हाताच्या चिमटीत धरल्यानंतर त्याचे तीन ते चार स्तर असतात. त्याच्या एका स्तरापर्यंतच ही लस द्यायची आहे.

  • त्यासाठी विशिष्ट प्रकाराची इंजेक्शन सिरींज आहे. ती सिरींज फक्त त्वचेमध्ये वरच्या स्तरापर्यंतच आत जाते. त्याच्या पुढे ती प्रयत्न केला तरीही जात नाही.

असे केले विश्लेषण

  • ‘आरटी-पीसीआर’ आणि अँटिबॉडिज निगेटिव्ह असलेल्यांना फक्त लस दिली

  • कोरोनाची लक्षणे किंवा सहव्याधी असलेल्या रुग्णांना लस दिली

  • शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती तपासून लस दिली

  • तीन डोस झाल्यानंतर मुलांमधील कोरोनाला प्रतिकार करण्याची शक्ती किती वाढली याचा निष्कर्ष काढण्यात आला

  • सगळी माहिती ‘डीसीजीआय’ला देण्यात आली.

loading image
go to top