सिंहगड कोविड केअर सेंटरमध्ये 'ती' गेल्या सहा महिन्यांपासून लावतेय जिवाची बाजी

dipti bachhav.jpg
dipti bachhav.jpg

कोंढवा (पुणे) : घरी आठ वर्षाचा स्वमग्न मुलगा. कामाच्या व्यापामुळे मुलाला अजिबात वेळ देता येत नाही. घरी थकलेले व आजारी असलेले आई- वडिल. त्यातच पतीला कोरोनाची संसर्ग झाला, अशा कठीण परिस्थितीतही डॅा. दीप्ती बच्छाव गेल्या सहा महिन्यांपासून महापालिकेच्या येवलेवाडी येथील सिंहगड कोविड केअर सेंटरमध्ये जीवाची बाजी लावून कोविड रूग्णांवर उपचार करीत आहेत. त्यांच्या या लढयाला कुटुंबियांची मिळणारी साथही तितकीच मोलाची आहे. 
सिंहगड कोविड केअर सेंटरमध्ये गेल्या सहा महिन्यात ४००० कोविड रूग्ण बरे होउन घरी गेले आहेत. तर ३००० हजार रूग्णांना होम क्वारंटाइन करून उपचार केले आहेत. 

या सेंटरमध्ये केवळ ३ रूग्ण दगावले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये या सेंटरचे काम नावाजलेले आहे. या सेंटरच्या प्रमुख वैदयकीय अधिकारी म्हणून डॅा. बच्छाव यांना त्याचे श्रेय दिले जाते. कर्तव्यपूर्तीची भावना आणि कुटुंबियांची खंबीर साथ तसेच कोविड सेंटरमध्ये काम करणारे माझे सर्व सहकारी यांचे सहकार्य यामुळेच या परिस्थितीतही मी निर्धाराने काम करू शकत आहे, तसेच पती अॅड. निलेश वरलेकर, वडील डॅा. भास्कर बच्छाव व आई आरूणा बच्छाव हे मला नेहमीच धीर देत असल्याने मला रूग्णांची चांगल्या प्रकारे सेवा करता येत असल्याने डॅा. दीप्ती यांनी नमूद केले. वडील डॅा. भास्कर बच्छाव व आई आरूणा बच्छाव हे दोघेही वैदयकीय क्षेत्रात काम करत असल्याने त्यांच्याकडून वैदयकीय क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. 

कोविड केअर सेंटरमध्ये येणाऱ्या प्रत्येक रूग्णांची लक्षणे वेगळी असतात. कुटुंबियांच्या मनात भिती आणि अनेक प्रश्न असतात. त्यांना समुपदेशन करून त्यांची भिती दूर करण्यसाठी डॅा. दीप्ती सातत्याने रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे समुपदेशन करत असतात. त्यामुळे अनेक रूग्ण बरे होउन घरी जातात व त्यांना फोन करून त्यांचे आभार मानतात, हीच माझ्या कामाची पावती आहे, याचे मला समाधान वाटते असे डॅा. दिप्ती यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

 डॅा. दिप्ती यांना या काळात नातेवाईक, शेजारी-पाजारी आणि एकंदर समाजाकडून आलेला अनुभव निराशाजनक आहे. या साथीच्या काळात त्यांच्या आईचा वाढदिवस होता. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्या माहेरी गेल्या. यावरून मुद्दाम दूरध्वनी करून अनेक नातेवाईकांनी त्यांची खरडपट्टी काढली. दिवसभर कोविड केअर सेंटरमध्ये राहून येते. म्हणून संसर्गाच्या भीतीने शेजा-यांनी फक्त डॅा. दीप्ती यांनाच नाही, तर त्यांच्या कुटुंबाला जणू वाळीत टाकले. मात्र, कर्तव्यपूर्तीची भावना आणि कुटुंबियांची खंबीर साथ यामुळेच या परिस्थितीही निर्धाराने त्या काम करू शकत आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डॅा. बच्छाव म्हणाल्या, आपल्यामुळे कुटुंबीयांना संसर्ग होईल, याची आम्हाला सतत धास्ती असते. त्यामुळे आठ वर्षाच्या स्वमग्न असलेला माझा दिव्यांग मुलगा विवान याच्यासमोर येणे टाळावे लागते. त्याच्यासाठी ते विचित्र होते; पण माझ्यासाठीही ते कठीण आहे. अनेकदा मला घरी यायला रात्रीचे २ वाजतात. त्यावेळी विवान बिचारा वाट बघून झोपी गेलेला असतो. आता हळूहळू त्यानेही हे समजूतदारपणे अंगवळणी पाडून घेतले. तो स्वमग्न असल्याने तो सहज इतर मुलांमध्ये मिसळत नाही आणि इतर मुलेही सहजपणे त्याला सामावून घेत नाहीत, मात्र यावेळी त्याने दाखविलेला समजूतदारपणामुळे माझ्यातील बळ वाढले आहे. त्यामुळेच एकीकडे विशेष मुलाला वेळ देणे, थकलेल्या आई-वडिलांची प्रकृती सांभाळे तर दुसरीकडे सेंटरच्या इन्चार्ज पदाची अवघड जबाबदारी त्या अतिशय चांगल्या प्रकारे हाताळत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 कोरोनाच्या महामारीत नागरिकांनी जबाबदारीने वागावे, स्वतःला सुरक्षित ठेवावे. मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. गर्दी करणे टाळावे, एकमेकांमध्ये आवश्यक अंतर राखावे. काही लक्षणे दिसली तर त्वरीत डॅाक्टरांना भेटावे. उपचार घेउन विषाणूला दूर ठेवावे, असे अावाहन त्यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com