दौंडमध्ये बॅंकेच्या कर्मचाऱ्यास कोरोना...प्रशासनाने घेतला हा निर्णय

corona1
corona1

दौंड (पुणे) : दौंड शहरातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक शाखेतील एका कारकूनास कोरोना विषाणूची बाधा झाल्याने शाखेचे कामकाज दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. शहरात आणखी एका रेशन दुकानदारास बाधा झाली आहे. 

दौंड पंचायत समिती समोरील जिल्हा बॅंक शाखेतील कारकूनास बाधा झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शाखेचे कामकाज १८ ते २० जुलै दरम्यान बंद ठेवण्यात आले आहे. बॅंकेच्या अन्य अधिकारी व कर्मचारी यांना विलगीकरणाच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती बॅंकेचे विभागीय अधिकारी नीलेश थोरात यांनी दिली. या शाखेत शेतकऱ्यांचे बचत खाते, साखर कारखान्यांचे पेमेंट, दौंड व शहराशेजारील गावातील विविध कार्यकारी सेवा संस्था, पतसंस्था, सहकारी संस्था, शिक्षक, शाळा, आदींचे खाते असल्याने दररोज किमान २५० ते ३०० ग्राहक येत असल्याने वर्दळ असते. बॅंकेच्या सुरक्षारक्षकांकडून सुरक्षित अंतर राखून ग्राहकांच्या रांगा लावल्या जात नसल्याने नगरपालिकेच्या कर्मचार्यांनी रांगा लावल्या होत्या. 

दौंड नगरपालिकेच्या एका ज्येष्ठ नगरसेवकास ३ जुलै रोजी, तर त्यांच्या पत्नीस ७ जुलै रोजी कोरोनाची बाधा झाली होती. दोघांवर पुणे येथे उपचार झाल्यानंतर ते दौंड येथे परतले होते. परंतु, १७ जुलै रोजी या ज्येष्ठ नगरसेवकांना पुन्हा बाधा झाली आहे. शहरातील एका ६१ वर्षीय रेशनिंग दुकानदारास १४ जुलै रोजी बाधा झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील पाच जणांना बाधा झाली आहे. तर १७ जुलै रोजी आणखी एका ५५ वर्षीय रेशन दुकानदारास बाधा झाली आहे. 

१९५ पैकी १४० जण उपचारानंतर बरे
दौंड शहरात १ मे ते १७ जुलै या कालावधीत शहरातील राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) गट क्रमांक सातचे ४६, गट क्रमांक पाचचे ५, पोलिस, इंडियन रिझर्व्ह बटालियनचे (आयआरबी) १५, पोलिस व १२९ नागरिक, असे एकूण १९५ जणांना बाधा झाली होती. त्यापैकी १४० जण उपचारानंतर बरे झाले आहेत. ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, सध्या ४६ जण उपचार घेत आहेत. 

कुरकुंभ :  दौंड  तालुक्यातील पांढरेवाडी हद्दीतील झगडेवाडी येथे दोघे कोरोनाबाधित आढळून आल्याची माहिती कुरकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश पाखरे यांनी दिली.

झगडेवाडी येथील  २१ वर्षीय तरूण व त्याची २० वर्षीय पत्नी कोरोनाबाधित आढळून आल्याने पांढरेवाडी हद्दीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोरोनाबाधित तरूण नोकरी शोधण्याच्या निमित्ताने पुण्याला गेला होता. पुण्याहून घरी परतल्यानंतर काही दिवसांनी त्रास होऊ लागला. त्यामुळे सदर पतीपत्नीचे घशातील नमुने कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. शुक्रवारी ( ता. 17)  त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून,  दोघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या दोघेही स्वामी चिंचोली येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. या बाधित पतीपत्नीच्या  संपर्कात आलेल्या १३ व्यक्तींचे घशातील नमुने कोरोना तपासणीसाठी घेण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. पाखरे यांनी दिली.
               

पांढरेवाडीपासून जवळ असलेल्या कुरकुंभ येथे दोन रूग्ण आढळून आले होते. मात्र पांढरेवाडी कोरोना शिरकाव झाला नव्हता. हे दोन रूग्ण आढळून आल्याने व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे घशातील नमुने तपासणीसाठी घेण्यात येणार असल्याने काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com