esakal | बारामतीकरांना काहीसा दिलासा, पण साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन
sakal

बोलून बातमी शोधा

Lockdown

बारामतीकरांना काहीसा दिलासा; पण उद्यापासून कडक लॉकडाऊन

sakal_logo
By
मिलिंद संगई,

बारामती - अनेक दिवसानंतर आज बारामतीकरांना (Baramati) कोरोनाच्या बाबतीत काहीसा दिलासा मिळाला. गेल्या अनेक दिवसात आज प्रथमच कोरोना पॉझिटीव्ह (Positive) येणा-या रुग्णांची टक्केवारी वीस टक्क्यांहून खाली आली. बारामतीत 3 मे रोजी 1260 नमुने तपासले गेले, यात 245 रुग्ण (Patient) पॉझिटीव्ह आढळले. हजारांहून अधिक रुग्णांची तपासणी होऊन पॉझिटीव्ह येणा-यांचे प्रमाण कमी झाल्याने आज काहीसा दिलासा मिळाला आहे.

दुसरीकडे कोरोना रुग्णांच्या (Corona Patient) मृत्यूचा आकडा चारशेच्या घरात गेला आहे. आज अखेर 400 रुग्णांचा बारामतीत मृत्यू झाला आहे, मृतांचा वाढणारा आकडा चिंता वाढवत आहे. एकूण रुग्णसंख्येचा आकडाही वेगाने 20 हजारांच्या टप्प्याकडे झेपावत आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 14 हजारांवर गेली आहे. 92733 जणांचे बारामती शहर व तालुक्यात लसीकरण पूर्ण झाले आहे. सध्या लस नसल्याने लसीकरण कार्यक्रमही थंडावला आहे.

हेही वाचा: 'किराणा दुकानांची वेळ वाढवून द्या; व्यापाऱ्यांची मागणी

आज मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊन....

दरम्यान कोरोनाची साखळी तोडण्यासाठी औषध, दवाखाना, प्रक्रीया करणारे व निर्यातक्षम उत्पादनांचे उद्योग वगळता इतर सर्व आस्थापना व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी जारी केले आहेत. फळे, भाजीपाला, किराणा व गॅस वितरण या सेवा घरपोहोच करण्यासाठी सुरु असतील. बँकाचे कामकाज नागरिकांसाठी बंदच असेल मात्र अंतर्गत कामकाज बँक कर्मचारी करु शकणार आहेत.

कायदेशीर कारवाई करता येणार नाही...

सर्वात महत्वाचे म्हणजे कोविडचा प्रादुर्भाव ऱोखण्यासाठी आवश्यक ते कृत्य व सदहेतूने केलेल्या कोणत्याही कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचारी यांच्या विरुध्द कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई किंवा खटला दाखल करता येणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

बारामतीत दिवसातून 100 जणांचे लसीकरण सकाळी सात ते नऊ या वेळेत महिला रुग्णालयात होणार आहे, त्याची नोंदणी आवश्यक आहे. दवाखान्यात जाताना अपॉईंटमेंट गरजेची आहे, नातेवाईक व डबा देणा-यांसाठी रुग्णालयांची शिक्क्यानिशी चिठ्ठी गरजेची असेल, विनाकारण फिरणारा सापडल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान बारामतीत एक उपविभागीय पोलिस अधिकारी, बारा अधिकारी व 120 कर्मचारी, राज्य राखीव दल व 40 होमगार्ड असा तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर व पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी दिली. शहरात सगळीकडे नाकाबंदी करण्यात येणार आहे.

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

loading image
go to top