आर्थिक संकटात एकमेव गुंतवणूक तुम्हाला तारणार!

वस्तुपाल रांका (संचालक, रांका ज्वेलर्स) 
Wednesday, 6 May 2020

आर्थिक मंदीच्या काळात इतर सगळ्याच  मालमत्तांमध्ये घसरण होते तेव्हा सोन्याला अत्यंत महत्त्व दिले जाते. दीर्घकालीन संपत्ती जपण्यासाठी भौतिक सोने हे  एक  सर्वात आदर्श रूप आहे.   

प्रश्‍न: जागतिक पातळीवर अस्थिरतेचे वातावरण असताना गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याबद्दल काय सांगाल? 
उत्तर : सध्या जगभरात कोरोनामुळे अस्थिरतेचे वातावरण आहे. जगभरातील गुंतवणूकदारांनी आता सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून सोन्याकडे मोर्चा वळविला आहे. सध्या गुंतवणुकीच्या इतर साधनांमध्ये केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य कमी झाले आहे. मात्र, सोन्याचे मूल्य वाढते आहे. जागतिक पातळीवर अस्थिरता निर्माण होते त्यावेळी सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. हजारो वर्षांपूर्वी सोन्याचा शोध लागल्यापासून आतापर्यंत प्रत्येक देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याने खूप महत्वाची भूमिका बजावली आहे. आर्थिक मंदीच्या काळात इतर सगळ्याच मालमत्तांमध्ये घसरण होते तेव्हा सोन्याला अत्यंत महत्त्व दिले जाते. दीर्घकालीन संपत्ती जपण्यासाठी भौतिक सोने हे एक सर्वात आदर्श रूप आहे. आर्थिक संकटाच्या काळात सोनेच तारणहार ठरणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रश्‍न : आपल्या पोर्टफोलिओमध्ये सोन्याचा समावेश करणे कितपत महत्त्वाचे वाटते? 
उत्तर : होय, प्रत्येकाने आपल्या पोर्टफोलिओमध्ये सोन्याचा समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे. वर्ष 2008-2009 या आर्थिक संकटाच्या काळात सुरुवातीला सोन्याच्या भावात घसरण झाली. शेअर बाजारातही मोठ्या प्रमाणावर पडझड सुरू होती. मात्र, नंतरच्या काळात सोन्यामध्ये पुन्हा तेजी आली आणि वर्षाअखेर भाव 14 हजार 500 रुपये प्रतिदहा ग्रॅमवर पोचले. जे वर्ष 2007-2008 मधील सोन्याच्या सरासरी भावापेक्षा दोन हजार रुपयांनी अधिक होते. आर्थिक मंदीच्या किंवा संकटाच्या काळात पोर्टफोलिओचे संरक्षण करण्याची ताकद सोन्यामध्ये आहे. मूर्त मालमत्ता म्हणून सोन्यामधील गुंतवणूक ही इतर प्रकारच्या गुंतवणुकीपेक्षा वेगळी नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रश्‍न : सोन्यातील गुंतवणूक जोखमीची समजली जाते याबाबत आपले काय मत आहे? 
उत्तर : माझ्या मते सोने खरेदीसाठी कोणत्याही विशेष कौशल्याची आवश्‍यकता नसते. सध्याच्या आर्थिक अस्थिरतेच्या काळात किंवा आर्थिक मंदीतही सोने हाच सर्वाधिक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहे. सोन्यात दिवाळखोरी होण्याची क्षमता नाही. शिवाय इतर मालमत्तेमध्ये असणारी कोणत्याही प्रकारची जोखीम सोन्यामध्ये नसते. उदा. इतर गुंतवणुकीच्या साधनांमध्ये तंत्रज्ञान वापरून गुंतवणूक विषयक माहिती हॅक करणे, मिटविणे शक्‍य आहे. ते सोन्यात शक्‍य नाही. शिवाय कोणत्याही स्वरूपातील सोन्याचे मूल्य कधीही नकारात्मक होत नाही हे गेल्या तीन हजार वर्षात सिद्ध झाले आहे. सोन्याने नेहमीच महागाई दरापेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे. आर्थिक संकटाच्या काळात तर सोने नेहमी मदतीला धावून येते. त्यात सर्वाधिक तरलता (लिक्विडीटी) मूल्य आहे. कोरोना संकटाच्या काळात सोने आणखी नवीन उच्चांकी भाव गाठण्याची शक्‍यता आहे. शिवाय राहणीमानाचा खर्च वाढतोय त्याप्रमाणात सोन्याच्या भावातही वाढ होते आहे. जेणेकरून सोन्यात केलेली गुंतवणूक भविष्यात नक्कीच फायदेशीर ठरेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus lockdown gold investment expert Vastupal Ranka interview