पुण्याच्या भवानी पेठेत कोरोना का पसरला? असं काय घडलं?

टीम ई-सकाळ
Saturday, 25 April 2020

राज्यातील कष्टकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलविणारे आणि त्यांना एकत्रित बांधणारे हमालपंचायत देखील याच परिसरात येते.

पुणे Coronavirus : अठरापगड जातींचा, कष्टकरी जमातींचा आणि शहरातील सर्वाधिक झोपडपट्ट्यांचा भाग म्हणजे भवानी पेठ. पुण्याची ग्रामदेवता भवानी मातेचे मंदिर याच परिसरात. तर देशाला समतेचा संदेश देणारा महात्मा फुले यांच्या वाडा देखील या क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत. समाजातील विविध जातींच्या नावाने असलेल्या गल्ल्या हे देखील याच क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसराचे वैशिष्ट.

पुण्यात महिलेचा कोरोनानं मृत्यू झाल्याची अफवा; जाणून घ्या वास्तव

अशी आहे भवानी पेठ
असे एक ना अनेक वैशिष्ट असलेले क्षेत्रीय कार्यालय म्हणजे भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय. 2018 मध्ये महापालिकेच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर शहरातील क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीची नव्याने फेररचना करण्यात आली. त्यामध्ये भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतही बदल झाला. या बदलामध्ये या क्षेत्रीय कार्यालयाच्या सुमारे 15 किलोमीटरच्या हद्दीत चार प्रभागांचा (चार वॉर्डांचा मिळून एक प्रभाग) समावेश करण्यात आला. सुमारे तीन लाख लोकसंख्या असलेल्या या क्षेत्रीय कार्यालयात पेठांचा भाग मोठ्या प्रमाणावर येतो. एरवी एैतिहासिक, भाग असलेल्या या क्षेत्रीय कार्यालयाचा परिसरात आज सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांची संख्या असलेला भाग म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. संपूर्ण शहराला पत्रा, बारदान-गोणपाट, धान्य, चमडे, बांबू , प्लॉवुड असे विविध वस्तू पुरविणार हा परिसर आज वेगळ्याच कारणामुळे चर्चेला जाऊ लागला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कष्टकऱ्यांचा परिसर कोरोनाच्या विळख्यात
अतिशय दाट वस्ती असलेला आणि सर्वच जातीधर्मांचे लोक या क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात राहतात. छोट्या-मोठ्या मिळून सुमारे 22 झोपडपट्ट्या या क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात येतात. कष्टकरी वर्ग आणि जातीनुसार व्यवसाय असलेल्या गल्ल्या आजही या परिसरात पहावयास मिळतात. राज्यातील कष्टकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलविणारे आणि त्यांना एकत्रित बांधणारे हमालपंचायत देखील याच परिसरात येते. बहुसंख्येने असलेला मुस्लिम, नवबौद्ध, मातंग, माळी,खाटीक, भोई, चांभार,तेलगू, तमिळी, खिश्च्रि न, राजस्थानी-गुजराथी असे अनेक जाती-उपजाती या परिसरात गेली शेकडो वर्ष एकदिलाने राहत आहेत. सर्वाधिक तालीम, मोठ्या मजिस्द, मंदिरे, चर्च असलेला हा परिसर म्हणजे समतेची ओळख करून देणार हा परिसर आहे. परिस्थितीमुळे जेमतेम शिक्षण घेतलेला, मिळेल तो व्यवसाय आणि कष्ट करणार वर्ग मोठ्या प्रमाणावर येथील झोपडपट्ट्यांमध्ये राहतो. मुंडीवाले,पायावाले, भेजावाले, कानातले मळ काढणारे, चांभार काम करणारे, लाकडावर कोरीव काम करणारे, बांबूपासून वस्तू बनविणारे असे अनेक कुटीर व्यावसायिकांचा हा परिसर. मिळून मिसळून राहणे येथील नागरिकांचा स्थायीभाव. दिवसभर कष्ट करून पोट भरणारा हा वर्ग आज कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विषाणूशी लढा!
दररोज पोटापाण्यासाठी लढाई करावी लागणाऱ्या या भागातील नागरिकांना आता या विषाणूशी देखील दोन हात करावे लागत आहेत. दहा बाय दहाच्या खोलीत आठ ते दहा जण राहणाऱ्या येथील रहिवाशांना घराबाहेर पडल्याशिवाय पर्याय नाही. त्यांना सोशल डिस्टिसिंग पाळणे म्हटले तरी शक्य नाही. वाढत्या उन्हामुळे घरात थांबणेही शक्यर नाही, अशा परिस्थितीत एकाच वेळी पोटाशी आणि विषाणूशी येथील नागरीक लढताना दिसत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus pune bhavani peth situation information marathi