मोठी बातमी : पिंपरी, पुणे परिसरातील शाळा बंद; मुख्यमंत्र्यांची घोषणा

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 13 मार्च 2020

राज्यात सापडलेले बहुतांश रुग्ण हे दुबई आणि अमेरिकेतून आल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

पुणे/मुंबई Coronavirus : राज्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने आवश्यक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यात सध्या 17 जण कोरोनाग्रस्त आहेत. त्यातील दहा जण एकट्या पुणे शहरातील आहेत. त्यामुळं पुणे आणि पिंपरी परिसरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुख्यमंत्री म्हणतात 'घरातूनच कामं करा'
राज्यात सापडलेले बहुतांश रुग्ण हे दुबई आणि अमेरिकेतून आल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. ते म्हणाले, 'महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्ण असले तरी, त्यांच्यातील लक्षणे ही अतिशय सौम्य आहेत. कोरोनाशी सामना करण्यासाठी आरोग्य खातं सज्ज आहे. जिल्हा रुग्णालयं आणि खासगी रुग्णालयं कोणतिही परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज आहेत.' कामा शिवाय घरातून बाहेर पडू नका. शक्य असेल त्यांनी घरातूनच काम करावं, घरातून काम करण्याच मुभा आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय. दरम्यान, पुण्यात कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. संबंधित व्यक्ती अमेरिकेहून परतल्याची माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. संबंधित रुग्णावर उपचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. यासह विदेशातून आलेल्या 700 प्रवाशांची तपासणी झाली असून, त्यातील 24 जणांवर उपचार सुरू असल्याचेही म्हैसेकर यांनी सांगितले. या सगळ्यात आतापर्यंत दहा जणांची रक्त चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पुण्यात मास्क आणि सॅनिटायझर जादा दराने विकणाऱ्या तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती म्हैसेकर यांनी दिली. दहा जणांना कोरोनाची लागण झाली असली तरी त्यांची प्रकृती सध्या उत्तम आहे, असेही म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

आणखी वाचा - कोरोनामुळं 'या' निवडणुकीवर प्रश्नचिन्ह 

आणखी वाचा - कोरोना पसरवण्यात अमेरिकी सैन्याचा हात

काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

  • महाराष्ट्रात सध्या पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक 10 रुग्ण 
  • मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाणे, नागपूर येथील थिएटर्स, नाट्यगृह बंद
  • मोठ्या शहरांमधील जीम, जलतरण तलावही बंद  
  • मध्य रात्रीपासून नियम लागू होणार 
  • रेल्वे आणि बस सेवेबाबत कोणताही निर्णय नाही; सेवा सुरूच राहणार
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus schools and colleges will shut down pune pimpri chinchwad cm uddhav thackeray