कोरोनाच्या दहशतीमुळे ...ही निवडणूक पुढे ढकलण्याची शक्यता?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 March 2020

एप्रिल महिन्यातील नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी होणाऱ्या प्रचारसभा, रॅली आणि इतर कार्यक्रमांमध्ये जमणारी गर्दी पाहता कोरोना व्हायरस आणखीन बळावण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याची दाट शक्‍यता वर्तवली जात आहे.

नवी मुंबई : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या नवी मुंबई महापालिका निवडणुकीवर संकट उभे राहिले आहे. कोरोना व्हायरस निदान झालेले दोन रुग्ण मुंबईत सापडल्यामुळे मुंबईसह नवी मुंबई परिसरातही खळबळ उडाली आहे. यादरम्यान एप्रिल महिन्यातील निवडणुकीसाठी होणाऱ्या प्रचारसभा, रॅली आणि इतर कार्यक्रमांमध्ये जमणारी गर्दी पाहता कोरोना व्हायरस आणखीन बळावण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याची दाट शक्‍यता वर्तवली जात आहे. मात्र याला सरकारी अधिकाऱ्यांकडून दुजोरा मिळू शकला नाही.

ही बातमी वाचली का? कोरोनामुळे अडलंय हापूसचं  घोडं, वाचा काय झालंय... 

राज्यात कोरोनाचा वाऱ्यासारखा फैलाव होत आहे. एप्रिल महिन्यात महापालिकेच्या निवडणुका होणार असल्यामुळे या निवडणुकीच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षांकडून आयोजित केल्या जाणाऱ्या सभांना गर्दी होणार आहे. तसेच उमेदवारांसाठी घेतल्या जाणाऱ्या कॉर्नर सभा, घरोघरी जाऊन केला जाणारा प्रचार, आदी सर्व बाबींमध्ये नागरिकांचा थेट संबंध येणार आहे. एका व्यक्तीचा अनेक व्यक्तींशी संबंध आल्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्यास अधिक पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्‍यता आहे. ही शक्‍यता पाहता सरकारकडून निवडणुका पुढे ढकलण्याबाबत विचार सुरू असल्याचे समजते. 

ही बातमी वाचली का? ठाण्यात आरोपीच करत होता सुरक्षा रक्षकाचे काम

संशयित रुग्णांना उपचारानंतर घरी सोडले
नवी मुंबई शहरात आतापर्यंत परदेशातून आलेल्या कोरोनाच्या १३ संशयित रुग्णांवर उपचार करून सोडून देण्यात आले आहे. ६ चीन, २ इराण, ३ दुबई, १ जर्मनी आणि एक नवी मुंबईतील असे एकूण १३ जण कोरोना व्हायरसची लागण नसलेले संशयित होते; परंतु आता महापालिकेचा आरोग्य विभाग त्यांच्या सतत संपर्कात असल्याची माहिती महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona effect on Navi Mumbai Municipal Election