बारामतीत आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण सापडला; कोणाला झाली लागण?

टीम ई-सकाळ
Tuesday, 14 April 2020

सदर 77 वर्षीय गृहस्थ हे घरातच असतात, ते बाहेर जात नाहीत, त्या मुळे त्यांना कोरोनाची लागण देणारी व्यक्ती बाहेरची असावी असा अंदाज

बारामती Coronavirus : शहरातील म्हाडा कॉलनीतील एक औषध दुकानात कार्यरत कर्मचा-याच्या 77 वर्षीय वडिलांना कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. बारामतीतील हा कोरोनाबाधित सातवा रुग्ण आहे. गेल्या काही दिवसात रुग्ण सापडला नसल्याने बारामतीला दिलासा मिळाला असे वाटत असतानाच आज पुन्हा रुग्ण सापडल्याने आता बारामतीकरांची चिंता पुन्हा वाढली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा 

सदर 77 वर्षीय गृहस्थ हे घरातच असतात, ते बाहेर जात नाहीत, त्या मुळे त्यांना कोरोनाची लागण देणारी व्यक्ती बाहेरची असावी असा अंदाज असून आता आरोग्य विभागाने त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींची यादी तयार करण्याचे काम सुरु केले आहे. म्हाडा कॉलनी परिसर समर्थनगरनजिकच असल्याने अगोदरच हा परिसर सील केलेला असून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केलेला आहे. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रशासनाच्या वतीने आता या गृहस्थांना कोणाकडून कोरोनाची लागण झाली याची तपासणी सुरु करण्यात आली आहे. संबंधित रुग्णाचा मुलगा एका होलसेल औषध दुकानात विक्रेता म्हणून कार्यरत असल्याचेही सांगण्यात आले. बारामतीत एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला असून, उर्वरित पाचही जणांची तब्येत ठणठणीत आहे, मात्र नव्याने रुग्ण सापडल्याने ही साखळी मोठी असावी की काय या शंकेने प्रशासन आता अधिकच सतर्क झाले आहे. बारामतीतील लॉकडाऊन अधिक कडक करण्याचा निर्णय प्रशासनाने अगोदरच घेतलेला असून बारामतीत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासही प्रारंभ झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus seventh positive patient baramati