esakal | जुन्याच माहिती दिल्याचा नगरसेवकांचा आरोप 
sakal

बोलून बातमी शोधा

 जुन्याच माहिती दिल्याचा नगरसेवकांचा आरोप 

जुन्याच माहिती दिल्याचा नगरसेवकांचा आरोप 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणे महापालिकेच्या सर्वसाधरण सभेत शहराचा पर्यावरण अहवाल आज मांडण्यात आला. या अहवालात जुनीच माहिती दिल्याचा आरोप काही नगरसेवकांनी केला. यामध्ये विरोधी आणि सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांचा समावेश होता. याची दखल महापौर मुक्ता टिळक यांनी घेत, सद्य:स्थितीची माहिती द्यावी, असे आदेश प्रशासनाला दिले.

अविनाश बागवे यांनी झोपडपट्टीधारकांना या अहवालात स्थान नाही, असा आरोप केला. नदीविषयी काही स्पष्टपणे माहिती नाही, गेल्या वर्षीची आकडेवारी दिल्याची टीका सुशील मेंगडे यांनी केली. या अहवालात उपाययोजनांसाठी एकच पान देण्यात आल्याकडे भय्यासाहेब जाधव यांनी लक्ष वेधले. काही कचराप्रक्रिया प्रकल्प बंद असूनही, ते सुरू असल्याची माहिती अहवालात दिल्याची टीका योगेश ससाणे यांनी केली. या अहवालात सद्य:स्थितीविषयी माहिती नसल्याची टीका विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केली. 

- एसटी, रेल्वे, पीएमपी या सार्वजनिक वाहतुकीचा वापर कमी होत असल्याकडे या अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे. त्याच वेळी विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढल्याचे नमूद केले आहे. गेल्या आर्थिक वर्षात 71 लाख 99 हजार 855 जणांनी विमान प्रवास केला. 

- अहवालात 2003, 2008, 2013 आणि 2018 मधील शहराची सॅटेलाइट छायाचित्रे समाविष्ट केली. यात नागरीकरण वाढल्याचे आणि हिरवाई कमी होत असल्याचे दिसते. 

- वाढती वाहनसंख्या आणि इंधन वापरामुळे प्रदूषणात वाढ होत असून, शहराच्या मध्यवर्ती असलेल्या मंडईपेक्षा हडपसर भागात प्रदूषण वाढल्याचे अहवालात नमूद केले. धूलिकणांचे वाढते प्रमाणाविषयी भीती व्यक्त करण्यात आली. 

- भटक्‍या कुत्र्यांचा प्रश्‍न गंभीर झाल्याचे आणि गेल्या वर्षभरात श्‍वान दंशाच्या 10 हजार घटना घडल्या आहेत. 

- निवासीवापराच्या विजेला अधिक मागणी आहे. त्याखालोखाल व्यावसायिक, औद्योगिक, महापालिका यांचा क्रमांक लागतो. अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. 

loading image