कॉसमॉस बँक गैरव्यवहार : काय आहे इंदूर कनेक्शन?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

 कॉसमॉस बॅंक सायबर हल्ला प्रकरणाच्यावेळी इंदूर येथील एटीएम केंद्रामधून सर्वाधिक रक्कम काढण्यात आली होती. त्याच ‘इंदूर टीम’च्या प्रमुखासह दोघांना ठाणे पोलिसांनी अटक केल्यानंतर आता पुणे सायबर पोलिसांच्या पथकाने ठाणे येथे जाऊन आरोपींची चौकशी करण्यास सुरवात केली आहे.

पुणे - कॉसमॉस बॅंक सायबर हल्ला प्रकरणाच्यावेळी इंदूर येथील एटीएम केंद्रामधून सर्वाधिक रक्कम काढण्यात आली होती. त्याच ‘इंदूर टीम’च्या प्रमुखासह दोघांना ठाणे पोलिसांनी अटक केल्यानंतर आता पुणे सायबर पोलिसांच्या पथकाने ठाणे येथे जाऊन आरोपींची चौकशी करण्यास सुरवात केली आहे.

आसीफ शेख, फिरोज शेख (दोघेही रा. आझमगढ, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. मुंब्रा येथे एकजण दोन वेगवेगळ्या नावांचे आधार कार्ड, पॅनकार्ड बाळगतो; तसेच वारेमाप पैसे उधळत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पहिल्यांदा शाबाज मोहम्मद आरीफ खत्री यास व त्यापाठोपाठ केशवराव मगतापात्र ऊर्फ रेड्डी या दोघांना २० ऑगस्ट रोजी अटक केली होती. त्यांच्या चौकशीमध्ये कॉसमॉस प्रकरणातील दोघेजण उत्तर प्रदेशमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, ठाणे पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या विशेष तपास पथकाच्या सहकार्याने आझमगढमधून आसीफ व फिरोज यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीमध्ये शाबाज खत्री याचा कॉसमॉस बॅंकेचा डेटा चोरी करण्याच्या आणि एटीएम कार्ड क्‍लोनिंग करून पैसे काढणाऱ्यांच्या टोळीमध्ये सहभाग असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या चौकशीमध्ये पुढे आली.

कॉसमॉस सायबर हल्ला प्रकरणामध्ये २६ देशांमधील एटीएममधून ज्याप्रमाणे पैसे काढले, त्याचपद्धतीने भारतातील कोल्हापूर, मुंबई, औरंगाबाद, अजमेर, इंदूर या शहरांमधील एटीएममधून पैसे काढण्यात आले होते. त्यासाठी त्या- त्या ठिकाणच्या काही टोळ्या सक्रिय होत्या. त्यांनी क्‍लोनिंग केलेल्या एटीएम कार्डचा वापर करून पैसे काढले होते. 

राजस्थानमधील अजमेर येथे दोन आरोपींनी १६ बनावट कार्डद्वारे पावणेअकरा लाख रुपये काढले, तर कोल्हापूरमध्ये १०१ बनावट कार्डचा वापर करून ३१ बॅंकांच्या ५२ एटीएममधून ८९ लाख ५७ हजार रुपये काढले. याच पद्धतीने इंदौरमधूनही पैसे काढण्यात आले होते. याच ‘इंदूर टीम’चा प्रमुख आसीफ शेख असण्याची दाट शक्‍यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cosmos Bank Cyber Attack Case

टॅग्स