
Pune News : बालभारती पौडफाटा रस्त्याचा खर्च १६ कोटीने वाढला
पुणे : कोथरूड आणि सेनापती बापट रस्त्याला जोडण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून बालभारती ते पौड फाटा हा नवीन प्रकल्प महापालिका हाती घेत असताना काम सुरू होण्यापूर्वीच याचा खर्च तब्बल १६ कोटी रुपयांनी वाढून २५२ कोटी १३ लाख रुपये इतका झाला आहे.
या भागातील एका खासगी विकसकाच्या बांधकामामुळे महापालिकेला सुमारे १२५ मीटरचा रस्त्याची जागा बदलावी लागल्याने हा खर्च वाढला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिकेने कर्वे रस्ता, पौड रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट रस्ता या भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बालभारतीपासून वेताळ टेकडीवरून थेट पौड फाट्यापर्यंत रस्ता केला जाणार आहे.
हा रस्ता टेकडीवरून जाणार असल्याने येथील पर्यावरणाची हानी होणार असल्याने पर्यावरण प्रेमी नागरिक व संघटनांनी यास विरोध केला आहे. पण भविष्यातील पुणेकरांची गरज ओळखून महापालिकेने हा प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला.
या रस्त्याच्या कामासाठी सल्लागार नेमण्यात आला, त्यांच्याकडून या परिसराचा अभ्यास करून त्याचा अहवाल महापालिकेला सादर केला. त्यामध्ये महापालिकेने काही रस्ता हा जमिनीवरून तर काही भाग हा इलोव्हेटेड असणार आहे. या इलोव्हेटेड मार्गामुळे टेकडीफोड होणार नाही असे महापालकेने सांगितले आहे.
या रस्त्याची निविदा प्रक्रिया सुरू होणार असताना पौड फाटा भागातील खाणीमुळे काम करताना अडचणी येणार होत्या, तसेच एका बांधकाम व्यावसायिकाच्या जागेतून व झोपड्याही रस्त्याच्या कामात येत असल्याने या रस्त्याची जागा बदलावी लागणार आहेत. दुसऱ्या भागातून हा रस्ता पौड फाट्याला जोडला जाईल. हा बदल केल्याने प्रकल्पाचा खर्च २३५ कोटी वरून २५२ कोटी १३ लाखापर्यत गेला आहे.
बालभारती ते पौड रस्ता या रस्त्यासाठी २३६ कोटी रुपये खर्च पुणे महापालिकेने अपेक्षित धरला होता. मात्र एका बांधकाम व्यावसायिकाची आड आल्याने रस्त्याची अलायमेंट बदलण्यात आली आहे. सुमारे १२५ मीटरने रस्ता बदलला असून, यामुळे प्रकल्पाचा खर्च १६ कोटी रुपयांनी वाढला. या प्रकल्पाची निविदा सोमवारी काढली जाणार आहे.
- व्ही. जी. कुलकर्णी, प्रमुख, पथ विभाग
रस्त्याची एकूण लांबी - १.८ किलोमीटर
यापैकी इलोव्हेटेड रस्ता - ४०० मीटर
रस्त्याची रुंदी - ३० मीटर
अंदाजे खर्च २५२. १३ कोटी