न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्यांना अखेर मिळणार दिलासा पण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Court.jpg

गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेले न्यायालयीन कामकाज सोमवारपासून (ता. 8) सुरू होणार आहे.

न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्यांना अखेर मिळणार दिलासा पण...

पुणे : न्यायालयात दाखल केलेला दावा निकालाच्या अंतिम टप्प्यावर असताना लॉकडाउनमुळे अनेक प्रकरणे लांबली आहेत. या सर्वांना आता दिलासा मिळणार असून शेवटच्या टप्प्यात असलेली प्रकरणे निकाली निघणार आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेले न्यायालयीन कामकाज सोमवारपासून (ता. 8) सुरू होणार आहे. 50 टक्के न्यायीक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत न्यायदान होणार असल्याने कामकाजाची गती कमी असण्याची शक्यता आहे. मात्र, तात्काळ प्रकरणे आणि निकालाच्या मार्गावर असलेले खटले प्राधान्याने संपवले जाणार आहे.

अबब! शिवाजीनगर स्टेशनच्या रुळावर दिसला अजगर मग...

त्यामुळे प्रलंबित दाव्यांची संख्या कमी होणार असून अनेक वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशाचा निकालाच्या टप्प्यात असलेल्या अनेक दाव्यांना मोठा फायदा होणार आहे. साक्षीपुरावे, आरोपीचा जबाब आणि दोन्ही पक्षांचा युक्तिवाद झाला आहे. मात्र, निकालाच्या टप्प्यात असताना लॉकडाउन झाल्याने लांबलेल्या प्रकरणांची संख्या मोठी आहे. आरोपीची निर्दोष मुक्तता होणार असेल तर तो दोन महिने कारागृहात अडकला आहे. तर शिक्षा झाली तर त्याला पुढील न्यायालयात अपील करण्याचा मार्ग मोकळा होईल, असे पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष मिलिंद पवार यांनी सांगितले.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

...तर आरोपीला लॉकडाउनचा फटका  
दोन्ही पक्षांनी केलेला युक्तिवाद, खटल्यातील साक्षीपुरावे यावरून आरोपीला शिक्षा द्यायचे की नाही याचा निर्णय न्यायालय घेत असते. एखाद्या प्रकरणात जर आरोपी निर्दोष सुटला तर त्याला लॉकडाउनचा फटका बसणार आहे. त्यामुळे ज्या आरोपींना असे वाटते आहे की, आपण निर्दोष सुटणार आहोत ते मोठ्या आतुरतेने न्यायालयाचे कामकाज सुरू होऊन त्यांच्या प्रकरणाच्या निकालाची वाट पाहत आहेत.बचाव पक्षाची बाजू मांडत असलेल्या माझ्या एका केसमध्ये फिर्यादी आणि आरोपी यांच्यात तडजोड झाली आहे. त्यामुळे त्यांना संबंधित प्रकरण मिटवायचे आहे. तसे झाल्यास आरोपी जामिनावर बाहेर येऊ शकतो. मात्र लॉकडाउनमुळे तो कारागृहातच अडकून पडला आहे. असाच प्रकार अनेक आरोपींच्या बाबतीत घडला आहे. तसेच अनेक आरोपींना शिक्षा होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे ज्याच्यावर अत्याचार झाला आहे ते देखील न्यायालय सुरू होण्याची व आरोपींना शिक्षा होण्याची वाट पाहत आहेत. 
अॅड. मिलिंद पवार, माजी अध्यक्ष, पुणे बार  असोसिएशन


 

  • न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्यांना दिलासा
  • अनेक वर्षे प्रलंबित दावे निकाली निघणार
  • शिक्षेस पात्र असलेले आरोपी कारागृहातच राहणार 
  • निर्दोष सुटल्यास आरोपी मोकळा श्वास घेतील 
  • जुनी प्रकरणे असल्याने न्यायालयात कमी गर्दी होईल 
  • तडजोड झालेले प्रकरणे लगेच संपतील