इव्हेंट्स, मनोरंजन उद्योगातील एक कोटी कामगारांवर संक्रांत!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 26 August 2020

भारतासह जगामधे अर्थव्यवस्था खुली करण्यासाठी पावले उचलली जात आहे. मात्र इव्हेंटसह मनोरंजन ,खेळ व इतर कार्यक्रमांवर बंदी आहे. गेले 5 महिने हा उद्योग बंद पडल्याने देशातील तब्बल एक कोटी लोकांच्या रोजगारावर थेट परिणाम झाला आहे.

पुणे - भारतासह जगामधे अर्थव्यवस्था खुली करण्यासाठी पावले उचलली जात आहे. मात्र इव्हेंटसह मनोरंजन ,खेळ व इतर कार्यक्रमांवर बंदी आहे. गेले 5 महिने हा उद्योग बंद पडल्याने देशातील तब्बल एक कोटी लोकांच्या रोजगारावर थेट परिणाम झाला आहे. त्यांच्यासाठी सर्व अटींचे पालन करून हा उद्योग सुरू करण्यास आम्ही तयार आहोत , सरकारने आम्हांस परवानगी द्यावी अशी मागणी एव्हेंट्स ॲड एन्टरटेन्मेंट मॅनजमेंटने (ईमा) केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे.

मिटींग, इन्सेन्टीव्ह, कन्व्हेंशन, एक्झिबिशन (बैठका, प्रोत्साहन कार्यक्रम, अधिवेशन, महोत्सव) मधील संघटित आणि असंघटित क्षेत्रामधे दरवर्षी सुमारे पाच लाख कोटी रुपयांची उलाढाल होते. कोविडमुळे जागतिक पातळीवरच या उद्योगाला मोठा फटका बसला आहे. मैफली, खेळ, धार्मिक कार्यक्रम आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचा यात अंतर्भाव केल्यास हा आकडा आणखी वाढू शकतो.

ईमाने (इइएमए) या बाबत पुढाकार घेतला असून, या उद्योगाशी संबंधित व्यक्ती आणि संस्थांना एकत्र घेऊन स्थानिक पातळीवर कार्यक्रम सुरु करण्याबाबत मार्गदर्शन करण्याचे निश्चित केले आहे. कार्यक्रम उद्योग पुन्हा सुरळीत सुरु व्हावा या साठी सरकारने योजना जाहीर करावी यासाठी सरकारवर दबाव आणता येईल.

ईमाने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये कार्यक्रम उद्योगातील आणि उद्योग क्षेत्राशी निगडित व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. उद्योग सुरु करण्याबाबत ईमाने तयार केलेल्या मार्गदर्शक सूचना यात जाहीर करण्यात आल्या. गेले काही महिने बंद असलेले प्रक्षेपण कार्यक्रम सुरक्षितपणे सुरु झाल्याचे सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचे निश्चित करण्यात आले. सुमारे दोन तास चाललेल्या या वेबिनारमध्ये उद्योगाशी संबंधित १ हजाराहून अधिक व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. काम सुरु करण्याची सर्वसाधारण मानके (स्टँडर्ड आॅपरेटिंग प्रोसिजर) यात जाहीर करण्यात आली. सर्व सहभागींनी एसओपी आणि उद्योग पुन्हा सुरु करण्याबाबत वेबिनार कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले.

वेबिनारची सुरुवात करताना ईमाचे अध्यक्ष रोशन अब्बास म्हणाले, " विविध स्वरुपाचे कार्यक्रम आयोजित करणारा हा उद्योग कोविड-१९ पुर्वी दोन अंकी वाढ नोंदवित होता. कोविडनंतर हा उद्योग एकदम ठप्प पडला आहे. टाळेबंदी शिथील करण्याच्या चौथ्या टप्प्यात सरकारने अनेक उद्योगांना काम सुरु करण्याची परवानगी दिली. मात्र, कार्यक्रम उद्योगासह काही उद्योगांना अजूनही काम सुरु करण्याची परवानगी मिळालेली नाही." याच बरोबर ईमाने समाज माध्यमांवर हॅशटॅग ओपन सेफ इव्हेंट्स २ सेव्ह इन्हेंट्स या नावाने मोहीम सुरु केली आहे. विविध कंपन्या, संघटना, व्यापारी संघटना यांना या मोहीमेमधे सहभागी होण्याचे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

विशेष कोविड टास्क फोर्सचे महासचिव सिद्धार्थ चतुर्वेदी यांनी ईमाच्या सदस्यांना उद्योग पुन्हा सुरळीत करण्यासाठी सर्वोपतरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार लवकरात लवकर उद्योग सुरळीत करण्याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. चार आठवड्यांच्या कालावधीमध्ये एसओपीच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी केली जाईल. एसओपी हा सरकार आणि संस्थेमधील संवादात एक महत्त्वाची भूमिका बजावेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 19 effect more than 1 crore workers in event and entertainment sector