बारामतीत कोविड हेल्थ केअर सेंटर सुरु

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 May 2020

कोरोनावर मात करण्यासाठी तालुक्यासाठीचे कोविड हेल्थ सेंटर आजपासून कार्यान्वित.

बारामती : कोरोनावर मात करण्यासाठी तालुक्यासाठीचे कोविड हेल्थ सेंटर आजपासून कार्यान्वित झाले. कोरोनाची तपासणी व उपचार दोन्हीही बारामतीत व्हावेत, त्यासाठी पुण्याला जावे लागू नये, या उद्देशाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून पाठपुरावा केला होता. अवघ्या पंधरवड्यात सर्व बाबींची पूर्तता करुन बारामती एमआयडीसीतील रुई ग्रामीण रुग्णालयाचे रुपांतर पूर्ण वेळ कोविड हेल्थ सेंटरमध्ये करण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बारामती शहर व तालुक्यातील ज्यांना आपल्याला कोरोनासदृश त्रास होत आहे त्यांनी आता या पुढील काळात फक्त रुई ग्रामीण रुग्णालयातच जायचे आहे. या ठिकाणी अतिदक्षता विभागात सहा बेडची व्यवस्था असून, आयसोलेशनसाठी 16 तर कोरोना संशयितांसाठी आठ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. यातही स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हे सेंटर अद्ययावत व्हावे यासाठी येथे सेंट्रलाईज्ड ऑक्सिजन पाईपलाईनही सज्ज झाली आहे. कोरोना रुग्णांबाबत व्यवस्थित माहिती संकलित करण्याच्या दृष्टीने एका कंट्रोलरुमची स्थापना करण्यात आल्याची माहिती रुई ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील दराडे यांनी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ज्यांना सर्दी, खोकला, ताप, घसादुखी, दम लागणे व अंगदुखी असेल त्यांनी तातडीने रुईच्या रुग्णालयात तपासणीसाठी जायचे आहे. ज्यांची लक्षणे कोरोनासदृश असतील त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते लगेचच एमआयडीसीतील मेडिकल कॉलेजमधील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. मध्यम स्वरुपाची लक्षणे असलेला रुग्ण असेल तर त्याला तेथेच दाखल करुन घेतले जाणार आहे, असे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजयकुमार तांबे यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, वरील लक्षणाखेरीज इतर लक्षणे असलेला रुग्ण असेल तर त्यांनी बारामती शहरातील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात जायचे आहे. तर गरोदर मातांनी एमआयडीसीतील महिला ग्रामीण रुग्णालयात जायचे असल्याचे डॉ. सदानंद काळे यांनी सांगितले. रुई ग्रामीण रुग्णालयात वरील लक्षणांखेरीजच्या इतर रुग्णांनी जाऊ नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: COVID 19 Health Care Center Started in Baramati