पुणेकरांनो खबरदारी घ्या! दुसऱ्यांदा विनामास्क आढळल्यास भरावा लागणार 1000 रुपये दंड

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 19 February 2021

लग्न समारंभासाठी 50 जणांनाच परवानगी, नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल करणार 

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरवात केली आहे. सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणी अचानक तपासणी करण्यात येणार असून, मर्यादेपेक्षा जास्त लोक आढळल्यास नोटीस देऊन दंड आकारण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा हीच परिस्थिती राहिल्यास गुन्हा दाखल करून दुकानाला सील ठोकण्यात येईल. लग्न समारंभासाठी मंगल कार्यालयात 50 पेक्षा अधिक लोक आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीवर पहिल्यांदा पाचशे रुपये आणि पुन्हा आढळल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. 

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी शुक्रवारी आदेश जारी केले आहेत. मंगल कार्यालये, हॉल, लॉन्स, कोचिंग क्लासेस, शाळा-महाविद्यालये, नाट्यगृह, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, शॉपिंग मॉल्स, धार्मिक स्थळे, उद्याने अशा सार्वजनिक ठिकाणी निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट-उपहारगृहे, बँक्वेट हॉल याठिकाणी वावरताना नागरिकांना मास्क, सॅनिटायझर वापरणे बंधनकारक राहील. खासगी अथवा सार्वजनिक कार्यक्रमाच्या आयोजनापूर्वी पोलिस ठाण्यामधून परवानगी घेणे अनिवार्य असेल. कार्यक्रमस्थळी कोरोनाबाबत निर्देशांचे पालन होते किंवा नाही, याची जबाबदारी आयोजकांवर राहील. उल्लंघन झाल्यास पोलिस ठाण्यामार्फत त्यांच्यावर कारवाई करावी. जिल्हा कार्यक्षेत्रात दंडाच्या वसुलीचे अधिकार ग्रामसेवक, पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. 

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुणे पोलिसांचा घेतला समाचार, म्हणाले...
 
रुग्ण आढळल्यास कंटेनमेंट झोन 

पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात येईल. संबंधित ठिकाणाचे निर्जंतुकीकरण स्थानिक स्वराज्य संस्थेने करावे. वाढती रुग्ण संख्या विचारात घेवुन कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत पूर्वतयारी करावी. रुग्णालयात पुरेशा खाटा आणि उपकरणे सुस्थितीत असतील याची खातरजमा करावी. रुग्णांच्या संपर्कात आलेल्या किमान 20 व्यक्तींचा शोध घ्यावा. भाजी मंडई, दुकानदार अशा लोकांच्या ठराविक अंतराने नियमित कोरोना चाचण्या कराव्यात. सामाजिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रम घेताना सरकारने ठरवून दिलेल्या सूचनानुसार कार्यवाही करणे बंधनकारक असेल. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वैद्यकीय अधिकाऱ्यांना तयारीचे निर्देश 

जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना आवश्यक तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनसमवेत सर्व खासगी डॉक्टरांची बैठक आयोजित करावी. ज्या रुग्णांना सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असतील, त्यांना तातडीने तपासणी करण्याबाबत सूचना द्याव्यात. तसेच, जिल्ह्यात सर्व व्हेंटिलेटर्स चालू आहेत किंवा कसे याची खात्री करून घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

  • सर्व आगार प्रमुखांनी बसस्थानकांवर तसेच बसमध्ये प्रवाशांकडून मास्कचा वापर आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे. 
  • बसेसच्या चालक आणि वाहकांना आवश्यक सूचना द्याव्यात. 
  • मास्क वापरण्याबाबत सक्तीने अंमलबजावणी करण्यासाठी संयुक्त पथके स्थापन करणार 
  • मास्क न वापरणाऱ्या व्यक्ती आणि वाहनधारकांवर दंडात्मक कार्यवाही 
  • धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी मंदिराच्या व्यवस्थापकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे 
  • मास्क न वापरणाऱ्या भाविकांना, ज्येष्ठ नागरिक आणि १० वर्षांखालील लहान मुलांना पासेस देऊ नयेत. 
  • सरकारी कार्यालयांमध्ये गर्दी होऊ नये यासाठी नोडल अधिकारी नेमून अर्जांवर तत्काळ कार्यवाही करावी.- रेल्वे, बस प्रवाशांनी ताप, सर्दी, खोकलासदृश लक्षणे दिसून आल्यास स्वत:हून गृहविलगीकरणात राहून कोरोनाची चाचणी करावी.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid 19 New Rule fine 1000 rs after catch second time without mask in pune