उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुणे पोलिसांचा घेतला समाचार, म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 February 2021

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावर अजित पवारांची सावध भूमिका घेतली आहे.''पोलिसांचा तपास सुरु आहे'' असे म्हणत अधिक बोलण्याचे टाळले. ''पूजा चव्हाण प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्यावर भाष्य करणे योग्य नाही असेही ते म्हणाले. संजय राठोड यांना पत्रकार परिषद घेण्यास सांगेन'' असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

पुणे : ''तळोजा कारागृहातून निर्दोष सुटलेल्या एका गुंडाची तळोजापासून पुण्यापर्यंत जंगी मिरवणूक निघाली. हे शहराच्या सामाजिक स्वस्थ्यासाठी चांगले नाही. तरुण पिढी पुढे आपण चुकीचा आदर्श ठेवत असून, ते घातक आहे. अशा घटना घडता कामे नये. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष ठेवावे. पोलिसांचा चोर, गुन्हेगारांवर वचक पाहिजे, सर्वसामान्य नागरीकांवर नाही.'', अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे कान टोचले. 

शहर पोलिस आयुक्तालयातर्फे शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात मुद्देमाल पुन:प्रदान व अनुकंपा भरती पोलिस पाल्यांना नियुक्तीपत्र देण्याच्या कार्यक्रमाचे पवार यांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, अपर पोलिस आयुक्त (प्रशासन) डॉ.जालिंदर सुपेकर आदी उपस्थित होते. निखिल भगवान पवार, अभिजित सुरेश दळवी, राहुल विलास सरोदे, अक्षय भगवान निकम, आकाश पांडुरंग घुले तसेच कोमल खैरनार, लोचना महाडिक, आदिती जाधव/टोपले आणि साकेत सोनवणे (लिपिक) आणि राजू भालेराव (कार्यालयीन शिपाई) यांना हे पत्र प्रतिनिधिक स्वरूपात नियुक्ती पत्र देण्यात आले. 

'भारतमातेच्या महान सुपुत्राला नमन'; PM मोदींनी शिवजयंतीनिमित्त शेअर केला VIDEO

चोरांना पाहून पळून गेलेल्या चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्याच्या प्रकाराबाबत पवार यांनी भाष्य केले, ""पोलिसांनी रात्र गस्ती वाढवावी. गुन्हे होणार नाहीत यावर काम करावं. पण, मध्यंतरी पोलिसच चोरांना पाहून पळाले. मला वाईट वाटलं. का घडलं हे शोधणे गरजेचे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ते काम केले पाहिजे. त्यांच्यावर कारवाई केली, हे खरं असलं तरी वर्षभर काम करणाऱ्या पोलिसांचे मनोबल यामुळे कमी होऊ नये. कारण याचा परिणाम त्यांच्या मनावर होतो.'' 

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांबाबत पवार म्हणाले, "कोरोना काळात ज्यांनी जीवाची बाजी लावून काम केले आहे, ते कौतुकास्पद आहे. आजही पोलीस काम करत आहे. या काळात काही पोलीसाना काम करताना वीर मरण आले आहे. त्याचवेळी कोरोनामुळे मृत्यु होणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये मदत व कुटुंबातील एकाला नोकरी असा निर्णय घेतला. त्यानुसार आज अनुकंपनुसार त्यांच्या पाल्याना नियुक्तीपत्र दिले आहे. दरम्यान पोलिसांवर टीका झाली. पण नियमांचं पालन करताना कठोर वागावं लागत. त्याला नाईलाज आहे.'' 

 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सहलीचे फोटो घरी आल्यावर कुठे टाकायचे ते टाका ! 
कुटुंबासोबत बाहेर फिरायला गेल्यानंतर लगेचच तिथले फोटो सोशल मिडीयावर टाकू नका, चोरटे, गुन्हेगार हीच संधी साधून तुमच्या घरी चोरी करतात. फिरायला जा, पण तिथे काढलेले फोटो घरी गेल्यानंतर कुठे टाकायचे, ते ठरवू. 

पुन्हा दागिने हरवले तर यांच्यावर कारवाई करा ! 
आत्ता दागिने परत मिळालेल्या नागरीकांच्या दागिन्यांची पुन्हा चोरी झाली, तर पोलिसांना तुमच्यावर कारवाई करायला सांगेल. सार्वजनिक ठिकाणी फिरताना नागरीकांनी आपल्याजवळ मोठ्या प्रमाणात दागिन्यांचा वापर टाळला पाहीजे. घरकाम करणाऱ्या महिला, सुरक्षारक्षक, रकेअर टेकर यांच्यासह आपल्या परिसरात एखादा संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती दिली पाहीजे. 

'राज्यपालांचा मी लाडका मंत्री, पण वाद सोडवू शकत नाही' 

रेल्वे पोलीस मजेदार असतात... 
रेल्वेत पाकीटमार चोर असतात. तिथे पाकीट चोरी होते. पण रेल्वे पोलीस एखाद्या जबाबदार व्यक्तीचे पाकीट असेल तर ते मिळवतात, हे कस काय घडत काय माहिती नाही, पण हे घडत. त्या व्यक्तीला घरी नेहून त्याचे पाकीट दिले जाते. त्यामुळे वेगळ्या चर्चेला वाव मिळतो 

गृहमंत्री वेगळ्या गाडीत... पोलीस अधिकारी 35 लाख रुपयांच्या गाडीत.  
मध्यंतरी मुंबईत होतो. त्यावेळी काही पोलीस अधिकारी आले होते. ते 35 लाख रुपयांच्या गाड्यात आले होते. आता आपण मंत्री किंवा इतरांना गाड्या घेताना त्याची निमावली असते. मग मी माहिती घेतली. तर कोण्या उद्योगपतीने कॅनन्व्हायसाठी या गाड्या दिल्या होत्या. त्यातल्या काही गाड्या अधिकारी वापरतात. आपण शासनाचे अधिकारी आहात. कुणी उद्योगपतीने गाड्या दिल्या म्हणून शासनाची ड्युटी करताना अश्‍या गाड्या वापरन हे विचार करण्याची बाब आहे. गृहमंत्री वेगळ्या गाडीत फिरतात आणि अधिकारी वेगळ्या गाडीत. पण ड्युटीवर असताना हे करण चुकीचे आहे. खासगी आयुष्य कोणीही कस जगावं. पण ड्युटीवर असताना त्याचा आदर आणि पालन झालेच पाहिजे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy chief Minister Ajit Pawar Scold the Pune Police