बारामतीत झपाट्याने वाढतायत रुग्ण; जाणून घ्या कारणे

मिलिंद संगई
Monday, 3 August 2020

बारामती शहरातील व्यवहार आता सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचपर्यंत सुरु झाल्याने साहजिकच लोकांचा वावरही आता झपाट्याने वाढू लागल्याने रुग्ण संख्याही वाढू लागली आहे.

बारामती : शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येने दीडशेचा तर मृतांच्या संख्येने 15चा टप्पा आज ओलांडला. काल बारामतीत घेण्यात आलेल्या 96 नमुन्यांपैकी 83 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यात शहर व तालुक्यातील सहा जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. बारामतीतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 154 पर्यंत गेली असून, माळेगाव येथील पॉझिटीव्ह रुग्णाला पुण्याला नेत असताना त्याचा मृत्यू झाल्याने कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता 15 झाली आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्याासाठी येथे क्लिक करा

नियमांचे उल्लंघन
दरम्यान, अजूनही 13 नमुन्यांचा अहवाल प्रतिक्षेत आहे. दरम्यान पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये चार जण बारामती शहरातील तर दोन जण तालुक्यातील आहे. 
कांबळेश्वर व पारवडी येथील दोघांचा तर शहरातील रुई येथील दोन जण तर तांबेनगर व फलटण रस्त्यावरील जाधव वस्तीवरील एक जण असे चार जण शहरातील आहेत.  दरम्यान उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 73 वर जाऊन पोहोचली आहे. 
पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने त्यांच्या संपर्कातील लोकही तितक्याच वेगाने पॉझिटीव्ह येत आहेत. नियमितपणे रुग्ण सापडत असतानाही बारामती शहरात नागरिक अद्यापही बेफिकीरच असल्याचे जाणवत आहे. नियमांचे सर्रास उल्लंघन होत असताना गर्दीच्या ठिकाणीही अनेकदा विनामास्क लोक फिरताना दिसतात. सॅनेटायझरचा वापर तसेच येणा-यांच्या नोंदी बाबतही दुकानदार आता उदासिन झालेले आहेत. 

आणखी वाचा - कुटुंबाने केले 1400 जणांवर अंत्यसंस्कार; समाजाची अनोखी सेवा

माहिती लपवण्याचे प्रकार
बारामती शहरातील व्यवहार आता सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचपर्यंत सुरु झाल्याने साहजिकच लोकांचा वावरही आता झपाट्याने वाढू लागल्याने रुग्ण संख्याही वाढू लागली आहे. बाहेरगावाहून येणा-यांच्या प्रमाणातही लक्षणीय वाढ होत असून अनेकदा माहिती लपविण्याचे प्रकार घडत असल्यानेही रुग्ण संख्या वाढू लागली आहे. 

ताण वाढू लागला
शहरातील रुग्णांची संख्या नियमितपणे वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणेसह सर्वच यंत्रणांवरील ताणही झपाट्याने वाढू लागला आहे. रुई येथे तपासणी साठी येणा-यांची संख्या तसेच वैद्यकीय महाविद्यालयात नमुने तपासणीसाठीचा ताण कमालीचा वाढला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 19 patient numbers increasing rapidly in baramati