esakal | कोरोना रुग्णांनो घराबाहेर पडल्यास गुन्हा; हातावर मारणार शिक्के
sakal

बोलून बातमी शोधा

covid test

घरीच विलग असलेल्या कोरोना रुग्णांनो, बाहेर पाय ठेवू नका. गल्लीबोळात उगाचच फेरफटका मारण्याचा विचारही करू नका. 

कोरोना रुग्णांनो घराबाहेर पडल्यास गुन्हा; हातावर मारणार शिक्के

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

पुणे - घरीच विलग असलेल्या कोरोना रुग्णांनो, बाहेर पाय ठेवू नका. गल्लीबोळात उगाचच फेरफटका मारण्याचा विचारही करू नका. चुकून-माकून तसे काही घडले तर उपचाराआधीच तुम्हाला पोलिसांच्या जाळ्यात अटकावे लागेल. म्हणजे कोरोनाची लागण झाल्यानंतर खबरदारीचे नियम डावलून घराबाहेर आल्यास तुमच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होणार आहे. कोरोनाचे रुग्ण घराबाहेर पडत आहेत, संसर्ग पसरू नये म्हणून ते कोणतीही काळजी घेत नाही आणि त्यातूनच कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अशा रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये (सीसीसी) दाखल करण्यासोबत त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला जाणार आहे. ज्यामुळे बेजबाबदार रुग्णांवर वचक राहण्याची आशा आणि कोरोनाचा संसर्गही रोखला जाईल. परंतु, या काळात मेडिकलमध्ये औषधे घ्यायला गेल्यानंतरही तुम्हाला कोरोना असल्याची कल्पना संबंधितांना द्यावी लागेल. रुग्ण बेफिकीर करत असल्याची पुसटशी कल्पना महापालिकेला आल्यास रुग्णांचा शोध घेऊन त्या-त्या भागातील पोलिस ठाण्यात तक्रार देण्याची व्यवस्था केली आहे.

रुग्णांच्या हातावर शिक्के
कोरोनाची लागण झालेल्या मात्र, या आजाराची फारशी लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच विलग राहण्याची सुविधा आहे. परंतु, त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला आणि नियमित औषधोपचाराचे बंधन आहे. असे असताना रुग्ण बेजबाबदारपणे सार्वजनिक ठिकाणी फिरत आहेत. या रुग्णांच्या हातावर शिक्केही मारले जाणार आहे. त्याची शाई पुसली जाणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाईल, असे महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

महापालिकेचे निरीक्षण
१) कोरोनाचे रुग्णांचा सार्वजनिक ठिकाणी वावर
२) घरीच उपचार घेणारे रुग्ण कोणतीही काळजी घेत नाही
३) अशा रुग्णांमुळे साथ पसरते

कोरोना रुग्ण घराबाहेर येणार नाहीत, यासाठी बंधने आहे. ते डावलूनही रुग्ण रस्त्यांवर येत आहेत. त्यातूनच संसर्ग वाढत आहे. इतर लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी काळजी न घेणाऱ्या रुग्णांविरोधात पोलिस ठाण्यांमध्ये तक्रार केली जाणार आहे.
- रुबल अग्रवाल,
अतिरिक्त आयुक्त, महापालिका 

हे वाचा - पुण्यात ऑक्सिजन न मिळण्याच्या तक्रारी, जिल्हाधिकाऱ्यांकडून 3 टोल फ्री नंबर जाहीर

काय उपाययोजना करणार
१) घराबाहेर येणाऱ्या रुग्णांना ‘सीसीसी’मध्ये दाखल करणार
२) रुग्णांच्या घरापर्यंत रुग्णवाहिका पाठविणार; पोलिसांचीही नजर
३) ‘होम आयसोलेशन’ रुग्णांवर मोबाईलच्या माध्यमातून संपर्क

loading image