धारावी पॅटर्नप्रमाणे घोडेगाव परिसरात आरोग्य तपासणी सुरू

चंद्रकांत घोडेकर
Sunday, 13 September 2020

घोडेगाव, काळेवाडी-दरेकरवाडी, धोंडमाळ-शिंदेवाडी व आंबेगाव गावठाण या चार गावांतील नागरिकांची आरोग्य तपासणी सुरु आहे.

घोडेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घोडेगाव व परीसरातील गावांमध्ये धारावी पॅटर्न राबवत घरोघर जाउन प्रत्येकाची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात ६० वर्षे वयोगटातील ९८ जणांची रॅपिड अॅंटीजन तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १५ जण कोरोना पॉझिटीव्ह तर ८३ जण निगेटीव्ह आले.   

घोडेगाव, काळेवाडी-दरेकरवाडी, धोंडमाळ-शिंदेवाडी व आंबेगाव गावठाण या चार गावांतील नागरिकांची आरोग्य तपासणी आरोग्य सेवक, सेविका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, शिक्षक, ग्रामसेवक, स्वयंसेवक, मंडलाधिकारी, तलाठी आदि जण प्रत्येकाच्या घरी जाउन प्लस रेट, ऑक्सिजन लेव्हल, तापमान चेक करण्यात आले.

यावेळी सुमारे दहा हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करून ३५५ लोकांची रॅपिड अॅंटीजन तपासणी करण्यात आली असता यामध्ये ६९ कोरोना बाधित रूग्णांना क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविण्यात आले. तर घोडेगाव व परीसरातील ६० वर्षे वयोगाटातील व रूग्णांच्या संपर्कातील ९८ जणांची ग्रामीण रूग्णालय घोडगाव येथे रॅपिड अॅंटीजन तपासणी करण्यात आली असता यामध्ये १५ जण कोरोना पॉझिटीव्ह निघाले आहे.

याबाबत गटविकास अधिकारी जालिंदर पठारे म्हणाले, घोडेगाव, काळेवाडी-दरेकरवाडी, धोंडमाळ-शिंदेवाडी, आंबेगाव गावठाण व इतर गावांतील नागरिक कोरोना बाधित रूग्णांच्या संपर्कात आलेले, ६० वर्षे वयाचे पुढील नागरिक, ज्या नागरिकांना त्रास होत असेल अशा नागरिकांनी ग्रामीण रूग्णालय घोडेगाव येथे रॅपिड अॅंटीजन टेस्ट करून घ्यावी.

मंचर, घोडेगाव या मोठया गावांमध्ये एकाच दिवशी आरोग्य तपासणी केल्यामुळे बाधित झालेले लोक सापडत आहेत. त्यामुळे बाधित लोकांना पुढे जाउन निर्माण होणा-या अडचणी कमी होत आहेत. तालुक्यातील वाढता आकडा रोखण्यासाठी सर्वेक्षणाचे हे काम अतिशय फायदेशिर ठरणार असून, पुढील काही दिवसांत आंबेगाव तालुका नियंत्रणात असेल. 

घोडेगावच्या सरपंच क्रांती गाढवे व उपसरपंच सोमनाथ काळे म्हणाले, ग्रामपंचायत घोडेगाव हद्दीतील सर्व कुटुंबांची covid-19 प्राथमिक तपासणी सर्व्हे करण्यात आला. सदर सर्व्हेसाठी शिक्षक, शिक्षिका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, पंचायत समिती कर्मचारी व ग्रामसेवक वर्ग यांनी उत्तम कामगिरी बजावली. तसेच ग्रामपंचायत घोडेगावचे सर्व कर्मचारी यांनी सुद्धा महत्वाचे कार्य बजावले. सर्व्हेच्या ४५ टीम करण्यात आल्या होत्या. प्रत्येक टीमला ग्रामपंचायत सदस्य व गावातील तरुण स्वयंसेवक यांनी गावातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती तपासला जावा याची दक्षता घेतली.

घोडेगावातले एकूण २७०० कुटुंबांची ऑक्सिजन व तापमान तपासणी करण्यात आली. त्यामधील संशयित रुग्णांना Antigen टेस्ट करण्यासाठी पाठवले. तसेच घोडेगावमध्ये ४ ठिकाणी Antigen टेस्ट करण्यासाठी लॅबचे नियोजन करण्यात आले. तसेच पोलीस स्टेशन व तहसील मार्फत योग्य त्या सूचना देण्यात आल्या. सर्व घोडेगाव ग्रामस्थांनी यासाठी संपूर्ण दिवस घरात राहून व व्यापाऱ्यांनी पेठा बंद ठेऊन महत्वाची जबाबदारी पार पाडली.

आंबेगाव पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे म्हणाले, आंबेगावातील 104 गावांपैकी 76 गावात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तालुक्यात आतापर्यंत 2005 कोरोनाबाधित झाले असून 1076 कोरोनाबाधितांना बरे होऊन घऱी सोडण्यात आले आहे. सध्या 874 बाधित उपचार घेत असून तालुक्यात 55 जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. तालुक्यातील महत्वाची मंचर, घोडेगाव, कळंब, अवसरी खुर्द येथील येथील रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मंचर येथे 769, घोडेगाव येथे 185, अवसरी खुर्द येथे 199, कळंब येथे 68 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पुढील काही दिवसात टप्याटप्याने प्रत्येक गावात रॅपिड सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid health check-up started in ghodegaon